नागपूरमधील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्राला (एमआरएसएसी) दिली भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
रायगड विकास प्राधिकरण व महाराष्ट्र सुदूर संयोजन संवेदन उपयोजन केंद्र, (एमआरएसएसी) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असलेल्या `महावारसा – किल्ले रायगड’ या प्रकल्पाच्या नागपूर येथील एमआरएसएसी केंद्रात खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी जाऊन पाहणी केली.
सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक, डॉ अशोककुमार जोशी, तसेच महावारसा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अजय देशपांडे यांनी वैज्ञानिक व तंत्रज्ञानाधारित रायगड किल्याची भूस्थानिक सूचना प्रणाली (जीओपार्शल डाटाबेस सिस्टिम) सादर केली.
रायगड किल्ल्याचे द्विमितीय व त्रिमितीय आलेखन नकाशे, रायगड किल्ल्यावरील इत्थंभूत माहिती सादर करणारी उपग्रह छायाचित्रे, ड्रोनद्वारे गडावरील अवशेषांचे विश्लेषणात्मक ऑर्थोफोटोज्, पाँईंट क्लाऊड, कौंटर्स ऑफ थ्रीडी मॉडेल्स याबद्दलची यावेळी माहिती देण्यात आली. गडाच्या सभोवतीच्या 21 गावांमधील जमीन तसेच जलव्यवस्थापन आराखडे देखील एमआरएसएसीमार्फत तयार करण्यात आले आहे. त्यासाठी नैसर्गिक साधन संपदेच्या तुलनात्मक विश्लेषणाचा वापर केला आहे. त्यासाठी जीऑलॉजी, जीओमॉफॉलॉजी, सोऊल, स्लोप आदीचा आधार घेतला आहे. गडाचा व गडाच्या सभोवतीचाही मास्टरप्लॅन तयार केला असून, 21 गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
एकमेव प्रकल्प
रायगडाचे संवर्धन व पुनरुज्जीवन करण्याचे कार्य, भूस्थानिक तंत्रज्ञानाचा (जीओपार्शल टेक्नॉलॉजी) उपयोग करून, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पार पडलेला आहे. संपूर्ण देशात राबविण्यात आलेला हा एकमेवाव्दितीय प्रकल्प ठरला आहे.