अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 18 सप्टेंबर, 2021 सकाळी 10.00
● लसीकरण मोहीमेसाठी योग्य नियोजन गरजेचे
● शहरी-निमशहरी भागात लसीकरणाबाबत उदासीनता
● गेल्या 24 तासात 315 नवे बाधित
● राजकीय कार्यक्रमात नियम पाळून गर्दी
सातारा / प्रतिनिधी :
कोरोनामुळे सगळ्यांचेच जीवनमान बदलून टाकले आहे. समाजशील माणूस माणसापासून दूर जाऊ लागला आहे. परंतु पुन्हा अनलॉकमुळे माणूस काहीसा जवळ येऊ पहात आहे. जिल्ह्यात गेले आठ दिवस मुक्कामी असलेले बाप्पा दोन दिवसांनी त्यांच्या गावी जातील. सगळे गणेश भक्त त्यांना निरोप देण्याच्या तयारीला लागले आहेत. असे असताना गणेशोत्सव ही संधी समजून राजकीय कार्यक्रमाना काहीसा नियम पाळून गर्दी करण्याचा पायंडा रुजू लागला आहे. त्यामुळे राजकिय गर्दीत कोरोना हरवला की काय अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या महालसीकरण मोहिमेला आठ दिवसांपूर्वी केलेले रेकॉर्ड ब्रेक करता आले नाही. नियोजनाचा अभाव दिसून आल्याने लसीकरण आवश्यक तेवढे झाले नाही. दरम्यान, गेल्या 24 तासात 315 जण नवीन बाधित आढळून आले आहेत.
लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
जसे लसीकरण व्हायला हवे तसे जिल्ह्यात होतांना दिसत नाही. राजकीय नेत्यांच्या जवळच्या कुटूंबातील सदस्यांना लस अन स्वॅब तपासणी गोरगरिबांच्या घरातल्या नागरिकांची केली जात आहे. असा प्रकार जिल्ह्यात सध्या सुरू आहे. प्रत्येकाला या कोरोनाच्या संकटावर मात करून स्वतःला जगायच आहे. त्याकरिता लस घेणं महत्वाचं आहे. गावोगावी सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी वर्ग कामात मग्न आहे. आणि कोरोनाची लस हुक्की येईल तशी कधी ही येते त्याचा कसला ही नियम नाही. त्यामुळे गावात लस येणार हे फक्त गावात पुढारी मंडळींना ज्ञात असते. राजकीय मंडळी आपल्या जवळच्या नातलग, कुटूंब यांनाच लस टोचून मोकळे होतात. वास्तविक घरोघरी प्रत्येकाला लस गरजेची आहे. म्हणूनच शुक्रवारी 1 लाख 82 हजार लसीचे डोस आले, खरे पण त्याच्या निम्म्याने सुद्धा लसीकरण झाले नाही. कसाबसा 80 हजाराचा टप्पा गाठला गेला. त्यातही 45 च्या पुढचे पहिल्या डोस घेणाऱ्यांची संख्या 98 टक्के तर दुसरा डोस घेणारे 58 टक्के होते. 18 ते 45 मधील पहिला डोस घेणारे 52 टक्के तर दुसरा डोस घेणारे 5 टक्के होते. एकूण 74 टक्के पहिला डोस तर दुसरा डोस 29 टक्के जणांनी घेतला गेला आहे. लसी करिता शहरी भागात ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे ती सहजपणे होत नाही. त्यामुळे लसीसाठी वशिला ही लावावा लागत असल्याने कालचे महालसीकरण अभियान पुरते फेल गेले आहे. अचानक लस येत असल्याने आरोग्य विभागाला नेटके नियोजन करता आले नसावे.
बाधितवाढीचा चढ-उतार
कोरोनाची आकडेमोड ही जिल्ह्यासाठी डोकेदुखी आहे. चढउतार ही बाब ठरलेली आहे. दोन दिवसांपूर्वी बाधित होणाऱ्यांची संख्या कमी झालेली होती. 202 एवढा आकडा होता.त्यात एका दिवसात परवा पेक्षा 113 जण जास्त बाधित आढळून आल्याने जिल्हावासीयांना ही चितेंची बाब आहे. काल दिवसभरात 11578 जणांच्या तपासण्या झाल्या तर 315 पॉझिटिव्ह आढळून आल्याने 2.72 एवढी पॉझिटिव्हीटी होती. त्यामुळे गणेश विसर्जन काळात नियम पाळणे गरजेचे आहे, असे प्रशासन आवाहन करत आहे.
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने 19,79,309
एकूण बाधित 2,46,000
घरी सोडण्यात आलेले 2,35,297
मृत्यू 6,022
उपचारार्थ रुग्ण 7,316









