प्रतिनिधी/ फोंडा
कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी नुकतीच तळावली येथील श्री महालक्ष्मी युवक संघाच्या ग्रंथालयाला सदिच्छा भेट दिली. संघाचे अध्यक्ष सुदेश भिंगी व इतर पदाधिकाऱयांनी मंत्री गोविंद गावडे यांचे स्वागत करून ग्रंथालयासंबंधी व संस्थेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.
महालक्ष्मी युवक संघाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान असून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून हे कार्य सातत्याने सुरु ठेवल्याबद्दल मंत्री गोविंद गावडे यांनी संस्थेचे अभिनंदन केले. तळावली गावात वाचक चळवळ रुजविण्यासाठी संस्थेच्या ग्रंथालयाची भुमिका महत्त्वाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाचकांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी संस्थेने या ग्रंथालयात वर्तमानपत्रे व नियताकालिकांबरोबरच विविध विषयांवरील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. समाजाला ज्ञान संपन्न करण्यासाठी ग्रंथालयांची भुमिका महत्त्वाची असून ग्रामीण भागातील ग्रंथालये सुसज्ज व त्यांना नवनवीन पुस्तकांबरोबरच साधनसुविधा पुरविण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
युवक संघाच्या ग्रंथालयाला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी धिरेंद्र तळावलीकर, योगेश सावंत, शैलेश सावंत, विठ्ठलदास नागवेकर, नारायण सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते. सुदेश भिंगी यांनी स्वागत केले.









