पाच भाषेत केला दिनदर्शिकेचा विस्तार
प्रतिनिधी/कोल्हापूर
`महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे-जिथे…साक्षात लक्ष्मी वसे तिथे’ ही टॅगलाईन घेऊन महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलेल्या महालक्ष्मी या मराठी दिनदर्शिकेचे संस्थापक सदाशिव दत्तात्रय शिर्के यांचे अल्पशा आजाराने काल, गुरुवारी (दि.4) खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. आठ दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदाशिव शिर्के हे जनमाणसात सदाभाऊ या नावाने परिचित होते. शिवाजी पेठ, दौलतराव भोसले विद्यालयासमोर ते वास्तव्य करत होते. त्यांचे वडील दत्तात्रय शिर्के यांनी मराठी सण उत्सवाबरोबरच संस्कृतीची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी 1948 साली डी. एन. शिर्के ऍण्ड सन्स हे या नावाने मराठी दिनदर्शिकेची स्थापना केली. बाहेरील प्रेसकडून कॅलेंडरची छपाई करून पश्चिम महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचले. दत्तात्रय शिर्के यांच्या निधनानंतर डी. एन. शिर्के दिनदर्शिकेच्या विस्ताराची जबाबदारी मुलगा सदाशिव म्हणजेच सदाभाऊ यांनी स्वीकारली. त्यांनी 1977 साली दिनदर्शिकेच्या व्यवसायात एक पाऊल पुढे टाकत महालक्ष्मी दिनदशिर्केची स्थापना केली.
शिवाजी पेठेतील घरात आधुनिक मशिनरी आणून त्यावर महालक्ष्मी दिनदर्शिकेची ते छपाई करून घेत होते. मराठी लोकांबरोबर अन्य भाषिकांपर्यंत डी. एन. शिर्के व महालक्ष्मी ही दोन्ही दिनदर्शिका जावीत, यासाठी त्यांनी दिनदर्शिकेचा 3 राज्यात विस्तार केला. हिंदी, इंग्रजी, कन्नड व गुजराती या भाषेंत दिनदर्शिकेची निर्मिती केली. या दिनदर्शिकेत सण उत्सवाबरोबर लोकजीवनाशी संबंधीत आवश्यकती सर्व माहिती समाविष्ट केल्याने तिला लाखोंच्या संख्येने मागणी येऊ लागली. वर्षागणिक वाढत चाललेल्या विस्तारामुळे सदाभाऊ यांनी 1985 साली कळंबा येथील त्रिमूर्ती कॉलनीत प्रिटींग प्रेसची स्थापना केली. कालांतराने त्यांनी प्रिटींग पॅकेजींग हा नवीन व्यवसायही सुरु केला. 2005 साली त्यांनी कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये अडीच एकरात प्रिटींग पॅकेजींग ही नवीन कंपनी स्थापन केली. ही कंपनी महाराष्ट्रातील एक अग्रणी युनिट म्हणून ओळखली जाऊ लागली, शिवाय या कंपनीत विविध रंगांचे तयार केल्या जाऊ लागलेल्या खाकीसह विविध रंगांमधील लहानमोठ्या बॉक्सना अनेक कंपन्यांकडून मोठी मागणी येऊ लागली आणि आजही ती येत आहे.
सदाभाऊ यांना सहलीची मोठी आवड होती. दिनदर्शिकेचा डोलारा सांभाळत त्यांनी इंग्लंड, जर्मनी, फ्रॉन्स, जपान, स्विर्त्झलंड, इटली, ऑस्ट्रीया, हंगेरी या देशात सहली करुन तेथील प्रिटींग पॅकेजिंगसह छपाई तंत्रज्ञानाचा अभ्यास केला होता. हे करत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली होती. सामाजिक संस्था, मंडळे आणि गरजूंना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत केली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे खजिनदार म्हणून ते गेली 8 वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पुढाकाराखाली मंडळाच्या शिवाजी मंदिर इमारतीचे नुतणीकरण आणि उभा मारूती चौकातील उभा मारूतीच्या जिर्णोद्धार झाला. दौलतराव भोसले विद्यालयात स्वखर्चाने फिजिओथेरपी सेंटरची उभारणी केली. अनेक लोक आजही या सेंटरचा लाभ घेतला. सदाभाऊंच्या निधनाची वार्ता शहरात वाऱयासारखी पसरली. विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या शिवाजी पेठेतील घरी जाऊन कुटुंबीयांचे सात्वन केले. सदाभाऊ यांच्या पश्चात भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. 10) सकाळी 9 वाजता आहे.
Previous Articleमतदान केंद्रांची संख्या 200 ने वाढणार!
Next Article कोरोनातही सक्तीशिवाय पालिकेची 46 टक्के वसुली









