ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक काढत 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत या निर्णयाला विरोध दर्शवत स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंत्रिमंडळ बैठकीत मात्र टास्क फोर्सशी सल्लामसलत करून शाळेबाबतचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार काल टास्क फोर्ससोबत प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये टास्कफोर्सच्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये. असा सल्ला देत. शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. त्यामुळे सरकारने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केले. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय.
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…
शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय अंतिमतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची बैठक पार पडेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.








