आ. शिवेंद्रसिंहराजेंची राजीव बजाज यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / सातारा
सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे. सुमारे ४५ एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मीती झाली होती. मात्र या कंपनीचे कामकाज सध्या बंद अवस्थेत आहे. सातार्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. बजाज उद्योग समुहामार्फत इथेनॉलवर चालणारी दुचाकी निर्मीती करण्यात येत असल्याचे समजले आहे. ही बाब आनंददायी आणि स्वागतार्ह असून इथेनॉलवर चारणार्या दुचाकीचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लांटमध्ये सुरु केल्यास पुन्हा ही कंपनी पुर्ण क्षमतेने सुरु होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि शेतकर्यांचा रोजगारनिर्मीतीचा उद्देशही सफल होईल. त्यामुळे याबाबत बजाज उद्योग समुहाने सकारात्मक विचार करुन दुचाकी निर्मीतीद्वारे सातार्यातील प्लांट पुन्हा सुरु करावा, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांच्याकडे केली आहे.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बजाज यांना निवदेन दिले आहे. सातार्यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- मोठे उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. ही कंपनी पुन्हा सुरु झाल्यास त्यावर अवलंबून असणारे लहान- मोठे उद्योग सुरु झाल्यास सातार्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. कंपनी पुन्हा सुरु झाल्यास सातारा येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आपल्या उद्योग समुहाने इथेनॉलवर चालणार्या दुचाकी निर्मीतीची सुरुवात केल्याचे समजले त्यामुळेच सातारा येथील प्लांटमध्ये या दुचाकीचे उत्पादन घेण्यासाठी कंपनी पुन्हा सुरु करावी असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने इथेनॉलची निर्मीती करत आहेत. पर्यायाने शेतर्यांनाही ऊसदर चांगला मिळत आहे. सातारा औद्योगिक वसाहतीतील एक नामांकित आणि प्रथितयश कंपनी म्हणून महाराष्ट्र स्कुटर्सचा नावलौकिक आहे. सातार्यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्ता प्राप्त होण्यासाठी ही कंपनी सुरु होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि सातारा येथील प्लांट पुन्हा सुरु करावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.