प्रतिनिधी / मालवण:
एमआयटी-पुणे शिक्षण संस्था समुहाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी जिल्हय़ातील सामाजिक कार्यकर्ते संतोष राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हय़ातील देवगड, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी व वेंगुर्ले या आठ तालुक्यात होणाऱया सरपंच संसदेच्या कार्याचे ते समन्वयक असतील, अशी माहिती या संसदेचे कोकण विभाग समन्वयक सुहास सातार्डेकर यांनी दिली.
निवडपत्र व ओळखपत्र वितरण तसेच महाराष्ट्र सरपंच संसदेच्या विद्यमाने पुढील वर्षात आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांविषयी विचारविनिमय करण्यासाठी 8 जानेवारी रोजी एमआयटी पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संतोष राणे यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्हातील सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱयांना निवडपत्र व ओळ्खपत्रांचे वितरण होईल.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी-पुणेचे कार्याध्यक्ष व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक राहुल कराड त्यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र सरपंच संसद’ स्थापन झाली. राज्याच्या सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत पंचायतराज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींची भूमिका मध्यवर्ती व सर्वात महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे ‘महाराष्ट्र सरपंच संसदे’चे प्रमुख उद्दिष्टय़ आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या कार्यरत व्यक्तींचे नेटवर्क तयार करून त्यांच्या सहकार्याने हे ग्रामविकासाचे राज्यस्तरावरील महत्वपूर्ण अभियान यशस्वीरीत्या विस्तारित करण्याचे काम महाराष्ट्र सरपंच संसद करीत आहे.









