आंतरराज्य बससेवा ठप्पच : बेळगाव, कोल्हापूर, सांगली जिल्हय़ातील प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकची बससेवा अगदी नगण्य….आणि संपामुळे ठप्प झालेली महाराष्ट्राची लालपरी…. यामुळे बेळगाव जिल्हय़ातील सीमाहद्दीसह कोल्हापूर, सांगली, मिरज भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात मोजक्मयाच बस धावत आहेत तर महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे.
बेळगाव, कोल्हापूर आणि सांगली जिल्हय़ातील नागरिकांची महाराष्ट्राची लालपरी आणि कर्नाटकच्या बससेवेवर प्रवासी वाहतूक अवलंबून असते. मात्र महाराष्ट्र लालपरीचे एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत तर कर्नाटकची बससेवा महाराष्ट्रात ठप्प झाली आहे. त्यामुळे बेळगाव सीमाहद्दीतील प्रवाशांसह कोल्हापूर, सांगली जिल्हय़ातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या संधीचा फायदा घेत काही खासगी वाहनधारक अधिक भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बेळगावसह कोल्हापूर, सांगली जिल्हय़ातील बससेवा विस्कळीत झाल्याने सीमाहद्दीवरील प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
कोरोनापूर्वी बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावणाऱया बसची संख्या अधिक होती. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत सीमाहद्दीवर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात मोजक्मयाच बस धावत आहेत. महाराष्ट्राची लालपरी केवळ कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीपर्यंत धावत होती. मात्र महाराष्ट्र एसटी कर्मचाऱयांनी राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी रविवारपासून संप पुकारल्याने महाराष्ट्राची लालपरी जाग्यावर थांबली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीतील प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील बसेस कर्नाटक हद्दीपर्यंत धावत होत्या. त्यामुळे प्रवासी सीमाहद्दीपर्यंत महाराष्ट्राच्या बसने प्रवास करून तेथून पुढे कर्नाटक बसने किंवा खासगी वाहनाने बेळगाव जिल्हय़ातील विविध ठिकाणी जात होते. मात्र आता दोन दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी संपामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे बेळगाव सीमाहद्दीसह कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात खासगी वाहनेच फिरताना दिसत आहेत.
खासगी वाहनांना अच्छे दिन
बेळगाव सीमाहद्दीवरील गावांसह कोल्हापूर आणि सांगली जिल्हय़ातील बससेवा कोलमडल्याने प्रवाशांना खासगी वाहने आधार ठरत आहेत. खासगी वाहनांना प्रवाशांची संख्या वाढल्याने अच्छे दिन आले आहेत. मागील दोन दिवसांपासून खासगी वाहनांवरच प्रवासी वाहतूक सुरू आहे.









