सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांचा दुसऱ्यांदा सन्मान : कोल्हापूरमध्येही बजावली होती सेवा
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या (मुंबई) सदस्यपदी सेवानिवृत्त पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोरे यांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच काढले.
मोरे हे मूळचे वडगाव पानचे (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) गावचे. 1978 मध्ये पोलीस दलात सरळ सेवेतून भरती झाले. मिरजेत त्यांनी 1980 ते 9184 या काळात पोलीस उपअधीक्षकपदी काम पाहताना कडक शिस्तीचा आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लौकिक संपादन केला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद, मुंबई, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक ग्रामीण येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कोल्हापूर जिल्हय़ात कार्यरत असताना त्यांनी बेळगाव येथे सुरू असलेल्या बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला होता. पुढे त्यांनी सोलापूर येथे पोलीस आयुक्त, औरंगाबाद, कोल्हापूरचे परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी काम पाहिले.
भगवंतराव मोरे यांच्या पोलीस दलातील सेवेबद्दल त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. पदोन्नतीनंतर त्यांनी राज्य पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारीही पार पाडली. केंद्र सरकारने त्यांची इंग्लंडमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विशेष निवड केल्याने त्यांना इंग्लंडमध्येही अभ्यास करण्याची संधी लाभली. मोरे यांच्या पोलीस दलातील कार्याचा सन्मान म्हणून याआधीही त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती, आता पुन्हा नियुक्ती करून राज्यपालांनी त्यांना दुसऱयांदा महत्वाच्या कार्याची जबाबदारी दिली आहे.