गेली जवळपास आठ दशके मराठी मनाला भुरळ घालणाऱया आणि भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया ज्ये÷ पार्श्वगायिका आशा भोसले यांना 2020 सालचा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाला आहे. राज्यातील कडवट राजकीय वातावरणाला मागे टाकत सरकारने घेतलेल्या या गोड निर्णयाने सर्वसामान्य मराठी माणूस नक्कीच सुखावला आहे. शुभ्र रंगाची मोठय़ा रेशमी काठाची साडी, गळय़ात मोत्याची माळ, सुहास्य चेहरा हे बाह्यरूप आणि मन समृद्ध करणाऱया गोड गळय़ाद्वारे अनेक पिढय़ांना आपल्या वाटणाऱया आशाताई उशिरा का होईना या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. ताईंना पाहिल्यानंतर सर्वसामान्य मराठी स्त्रीचे रूप डोळय़ासमोर उभे राहते. आयुष्यातील अनेक चढ-उतारांना खंबीरपणे सामोरे जात त्यांनी स्वतःला घडवले. मंगेशकर आडनावाची समृद्ध ओळख बाजूला ठेवत भोसले बनलेल्या आशाताई या मुळातच बंडखोर वृत्तीच्या. जणू माळावर उगवलेले आणि वाऱयाच्या झोताला आव्हान देत आपल्याच मस्तीत मस्त डोलणारे रानफूल! या रानफुलाची भुरळ महाराष्ट्राला अल्पावधीतच पडली. देशाने अनेक प्रकारची कसोटी पाहत त्यांना हळूहळू मान्यता देऊ केली. नव्हे आशाताईंनी आपल्या लहेजाच्या जोरावर ती मान्यता मिळवली. 1943 साली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून पार्श्वगायनाला प्रारंभ आणि त्या आवाजाची जादू वयाच्या 88 व्या वषीही चालावी हे आश्चर्यच. एकेकाळी पंजाबी गायिकांचा वरचष्मा असताना मराठी मुलींनी मिळवलेले हे यश साधे सोपे नव्हते. हे समजून घेतले तर आशाताईंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्त्व समजेल. मराठी रसिकांना नक्षत्रांचे देणे देणाऱया, दीपस्तंभ असणाऱया गायक, संगीतकारांची प्रसंगी नक्कल करून संगीताचे महत्त्व समजावून देणाऱया, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा अनुभव पुढच्या रसिक पिढीपर्यंत पोहोचवणाऱया आशाजींनी मराठी माणसाला खूप काही दिले. गीताच्या शब्द आणि संगीतामागील भावना लक्षात घेऊन ते कोणत्या नायिकेवर चित्रित होणार आहे याचा विचार करून पार्श्वगायन करणाऱया ताई नूरजहाँपासून विद्या बालनपर्यंतच्या प्रत्येक पिढीतील नायिकेचा पहिला आवाज बनल्या. नायिकेला वयाची मर्यादा असते. पण, गायिकेला नाही! असे या मागचे त्यांचे लॉजिक. तेही अगदी सिद्ध करून दाखवलेले! अंगी बंडखोर वृत्ती, आव्हानांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची तयारी असल्याशिवाय हे शक्मय नाही. वयाच्या सोळाव्या वषी घराबाहेर पडल्यानंतर कुटुंब, तीन मुलांची जबाबदारी पेलून, तिथे आलेल्या प्रत्येक अनुभवाला मनात दाबून ठेवत सुहास्य मुदेने त्या स्टुडिओची पायरी चढायच्या. एकेका दिवसात चार ते सात वेगवेगळय़ा प्रकारची गाणी वेगवेगळय़ा संगीतकाराच्या मनातील कल्पना लक्षात घेऊन तंतोतंत साकारायच्या. मधल्या वेळेतील एखादा तास माझी मुले लहान आहेत, त्यांना खायला घालून येते म्हणून धावत घरी पोहोचायचे आणि त्यांची जबाबदारी पार पाडून पुन्हा स्टुडिओ गाठायचा हे सोपे काम नक्कीच नाही. प्रसंगी ब आणि क दर्जाच्या चित्रपटांनाही नकार न देता त्या गात राहिल्या. ती केवळ आपली गरज आहे म्हणून नव्हे तर या साऱया कष्टातून आपण नक्कीच यशस्वी होऊ या निर्धाराने त्या गात राहिल्या. वेगवेगळे प्रयोग करत राहिल्या. 1952 पर्यंतची ही लढाई दिलीपकुमार अभिनित आणि संगीतकार सज्जाद हुसेन यांच्या संगदिलपर्यंत सुरूच राहिली. त्यातून विमल रॉय यांच्या परिणीतासाठी दार किलकिले झाले. 1956 साली ह्रिदम किंग ओ. पी. नय्यर यांचा सीआयडी आणि 1957 सालचा नया दौर, बी. आर. चोप्रा, ओपी आणि आशाजी अशा सर्वांनाच जनमानसात स्थान निर्माण करून गेला. सचिनदेव बर्मन यांनी संधी दिली. 1966 साली तीसरी मंजिलच्या निमित्ताने आर डी बर्मन ऊर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले आणि कमाल झाली. किशोर कुमार-आशा तसेच रफी-आशा या जोडय़ांनी सुपरहिट गाण्यांची मालिकाच दिली. 1960 ते 70 च्या दशकात डान्सर हेलनचा आवाज म्हणजे आशा. पिया तू, ओ हसीना, ये मेरा दिल ही गाणी असोत की आधीची इना मीना डिका, रेशमी सलवार, निगाहे मिलाने को, इश्क इश्क, झुमका गिरा रे, पर्दे मे रहने दो, दीवाना हुआ बादल, छोड दो आचल, आजा आजा, चुरा लिया है, तू है वही ही लोकप्रिय गाणी आणि त्याचवेळी आपल्या टीकाकारांना जोराचा तडाखा देत ऐंशीच्या दशकातील रेखावर चित्रीत झालेली उमराव जान आणि इजाजत मधील पारंपरिक गझल गात दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याचा पराक्रम असो की 1995 साली रंगीलाद्वारे पदार्पण करणाऱया उर्मिलाचा आवाज असो आशाजींनी आपली जादू कायम ठेवली. रिमिक्सच्या जमान्यात आर. डी. बर्मन यांच्या गीतांचे सुरू झालेले विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दुखावलेल्या आशाताईंनी पंचमदांच्या मृत्यूपश्चात ’राहुल अँड आय’द्वारे त्यांची गाणी रिमिक्सही केली. अनेक संगीतकार, अनेक सहगायक, अनेक नायिका या सर्वांना साथ एकच होती. त्या म्हणजे आशाताई! बारा हजारहून अधिक गाणी, असंख्य भारतीय तसेच इंग्रजी आणि रशियन भाषेत गीत गायन करत हा आवाज जगातल्या कानाकोपऱयात घुमतो आहे. आजच्या पिढीचे मनही समृद्ध करतो आहे. या बंडखोर स्त्रीला सुरेश भटांनी शब्दात कैद करण्याचा तर गो नी दांडेकर यांनी ’जैत रे जैत’ची नायिका चिंधीच्या व्यक्तिरेखेत साकारण्याचा प्रयत्न केला. आशाजी त्याहीपुढे जाऊन पोचलेल्या आहेत. दुःखांना मागे सारत गायिका झाले नसते तर चांगली सुगरण बनले असते म्हणत त्यांनी आपल्यातील सामान्य जगणे जगणाऱया मराठी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन नेहमीच घडवले. म्हणूनच पद्मविभूषण, दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारापेक्षाही महाराष्ट्र भूषण ही आशाताईंची नवी ओळख खऱया अर्थाने सह्याद्रीच्या काळय़ा पत्थरात फुलणाऱया मराठी स्त्रीची, रानफुलाची ओळख आहे.
Previous Articleकोरोना संक्रमण झपाटय़ाने वाढले असले तरी, मृत्युदर अत्यल्पच
Next Article काश्मीरचा ‘स्वर्ग’ लोकांसाठी खुला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








