सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नसतो. त्यामुळे राजकारणात जय-पराजय होतच असतात. पण झालेल्या पराभवापासून योग्य तो बोध घेत, योग्य रणनीती आखणे, पुढील निवडणुकीसाठी गरजेचे असते. भाजपा तसे करेलच. कारण भाजपा व सध्याच्या काँग्रेसमधे हाच तर फरक आहे. देशभरात भाजपाच्या विजयाचा डंका वाजत असताना महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या सहापैकी पाच जागी झालेला पराभव आत्मपरीक्षण करायला लावणारा तर आहेच, पण राज्यातील भाजप धुरिणांना लांछनास्पद आहे. कारण एवढी अनुकूल स्थिती असताना जर पराभव होतो आणि तोही बालेकिल्ल्यात, तर किती प्रचंड आत्मपरीक्षणाची गरज आहे, हे लक्षात येईल. राज्यात, देशात काँग्रेसची लाट असतानादेखील नागपूरचा मतदारसंघ कायम भाजपाच्या बाजूने राहिला होता.
गेली पाच दशके नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात होता. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस, त्यांच्यानंतर नितीन गडकरी आदी दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अनिल सोले हे गडकरींचे समर्थक गेल्यावेळी निवडून आले. गेले तीन महिने कोरोनाचा कहर चालू असतानाही आपल्यालाच तिकीट मिळणार हे गृहीत धरून त्यांनी मेहनतीने धडाक्मयात प्रचार केला होता. मात्र फॉर्म भरायच्या 2-3 दिवस आधी त्यांना उमेदवारी नाकारून, ती देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक व नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना दिली गेली. संदीप जोशींनी नागपूर महानगरपालिका पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे नुकतेच जाहीर केल्याने ‘तेलही गेले, तूपही गेले’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. अचानक त्यांना दिलेली उमेदवारी त्यांच्या पराभवाला कारणीभूत झाली असावी का? नेमक्मया याच संधीचा फायदा काँग्रेसला मिळाला. काँग्रेससाठी नागपूरचा विजय अतिशय आनंदाचा आणि मनोधैर्य वाढवणारा आहे. गेली कित्येक वर्षे या मतदारसंघात काँग्रेसला पराभवच पत्करावा लागला होता. त्यामुळेच अभिजित वंजारी यांचा विजय कौतुकास्पदच आहे. एक लक्ष्य निश्चित करून त्या दिशेने त्यांनी सातत्याने सुरू ठेवलेले प्रयत्न यावेळी फलदायी झाले आहेत. या विजयात त्यांच्या वैयक्तिक संपर्कासोबतच, त्यांना महाआघाडीतील तिन्ही पक्षांची साथ यांचेही भरीव योगदान आहे. राज्यातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच व धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एक, अशा सहा जागांच्या पार पडलेल्या निवडणुकांपैकी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अमरीश पटेल यांची उत्तर महाराष्ट्रातील जागा सोडता, भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.
अमरीश पटेल हे मूळचे काँग्रेसचे असून त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे त्यांनी जिंकलेली ही जागा भाजपपेक्षा त्यांच्या स्वतःच्या करिष्म्यावरच जिंकली असे म्हणावे लागेल. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणता येईल, इतका भक्कम होता. गेल्या सुमारे 55 वर्षात विरोधी पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत प्रचंड जुळवाजुळव व श्रम घेऊनही, त्यांना भाजपाला पराभूत करता आले नव्हते. परंतु यावेळी मात्र महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस समर्थक उमेदवार संदीप जोशी यांना पराभूत केले आहे. हा भाजपा व फडणवीसांसाठी फार मोठा धक्का आहे यात वादच नाही. भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी मशागत करून ठेवलेला हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. या निकालावर भाजपाचे एक ज्ये÷ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया राज्यातील भाजप नेते गंभीर नसल्याचे सिद्ध करणारी आहे. ते म्हणाले की, आम्ही गाफिल राहिलो. प्रतिक्रिया अनाकलनीय आणि मानभावी यासाठी की, कुठलीही निवडणूक हलक्मयाने घ्यायची नाही, अशी मोदी-शहांची पद्धत असल्याने नागपूरमध्ये मात्र भाजपा गाफिल राहते, हे पटणारे नाही. नुकत्याच झालेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने जे. पी. नड्डा, अमित शहा, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, तेजस्वी सूर्या, देवेंद्र फडणवीस इत्यादी महत्त्वाचे नेते प्रचारात उतरवत संपूर्ण शक्ती लावली होती. नागपूरच्या बालेकिल्ल्यात हरल्यानंतर दुसरा धक्कादायक पराभव म्हणजे पुणे पदवीधर मतदारसंघातील होय. पुण्यात भाजपाचे चंद्रकांत पाटील यापूर्वी आमदार होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या जागेवर भाजपाचा पराभव होणे, हे पक्षासाठी लांच्छनास्पद आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भाजपाने पदवीधरांचे आमदार चंद्रकांत पाटील यांना उतरविले होते. त्यावेळीच भाजपाच्याच कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये खूप नाराजी होती. पाटील पराभूत होतात की काय, असे वातावरण होते. परंतु, ते दुसऱया, तिसऱया फेरीत निवडून आले होते. त्यानंतर नाराज कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क करून त्यांच्यातील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न झालाही असेल, परंतु तो इतका यशस्वी झालेला दिसत नाही, असेच या निकालावरून दिसून येते. चांगले काम व जनसंपर्क असलेल्या मेधा कुलकर्णींना डावलून मागील विधानसभेत चंदकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याची भरपाई म्हणून आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मेधाताईंनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना संग्राम देशमुखांना उमेदवारी देण्यात आली. पुणे मतदारसंघातील पराभवाला इतर काही कारणे असली तरी पराभवाचे हे मुख्य कारण असावे असे वाटते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि नागपुरात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. अमरावतीत शिवसेनेने श्रीकांत देशपांडे यांना पुरस्कृत केले, तर भाजपने नितीन धांडे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे कार्यकर्ते किरण सरनाईक बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले. त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. त्यांनी वाशीम, अकोला, बुलडाणा या तीन जिह्यांमधील शिक्षकांना एकत्र करीत बाजी मारली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. एकंदर या निवडणुकीने ‘महाविकास आघाडी’ ही केवळ पक्षातील नेत्यांच्या पातळीवरच नव्हे तर तळातील कार्यकर्त्यांच्या पातळीवरदेखील ही एकजूट झाल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपसाठी ही खूप मोठी धोक्मयाची घंटा आहे, हे महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार आपसुक पडेल म्हणून वाट पाहणाऱया राज्यातील भाजपाच्या बोलभांड नेत्यांना कधी कळेल त्यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
विलास पंढरी








