आजच्या कोरोनाच्या महासंकटाला सरकारचे अपयश कारणीभूत आहे. या संकटामधून कधी मुक्तता होते, याची जनता वाट पाहत आहे. राज्यात कोरोनावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात घाणेरडे राजकारण सुरू झाले असून त्यालाही जनता कंटाळली आहे.
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातील बढय़ा राष्ट्रांच्या तुलनेत भारताची हानी कमी झाली आहे. भारताने लॉकडाऊनचा योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाचा प्रादुर्भावाचा प्रभाव अन्य देशांच्या तुलनेत कमी झाला. मात्र, महाराष्ट्र कोरोनामुक्त कधी होणार, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
सध्या लॉकडाऊन चौथा टप्पा सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार, दुकाने, हॉटेल्स, स्टॉल आदी बंद आहेत. त्यामुळे कामगार, नाका कामगार, नोकरदार, फेरीवाले, लहान दुकानदार, पान-तंबाखू टपरीवाले, इस्त्राrवाले, टेलर, सलून, प्लंबर, कुंभार, चर्मकार, लघु उद्योग करणारे, पोळी भाजी पेंद्र, खानावळ, वडा, भजी पाव, मिसळ पाव, भाजी, खेळणी विक्रेते आदींचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच अनेक कंपन्या बंद पडल्याने त्या कंपनी मालकांचे लाखो रु.चे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तेथे काम करणारे लाखो सामान्य कामगार यांच्या नोकऱया गेल्या आहेत. काही ठिकाणी तर सरकारी आदेश असतानाही कामगारांना पगार दिलेले नाहीत, तर काहींना अर्धाच पगार देण्यात आलेला आहे. तोही एक आठवडा, पंधरा दिवस उशिराने दिला आहे. काही कंपन्यांनी तर कामगारांना जबरदस्तीने त्यांच्या हक्काच्या रजा वापरायला सांगत रजेवर पाठवले आहे.
जसजसा कोरोनाचा प्रभाव वाढत गेला, रुग्णांची संख्या आणि मफतांची संख्या ही झपाटय़ाने वाढत गेली तसेतसे परप्रांतीय मजुरांची, मुंबईकरांची चिंता वाढली. हा लॉकडाऊन उठणार कधी, आम्हाला कामे मिळतील कधी, आम्ही कधी पूर्वीसारखे जीवन जगणार, असे प्रश्न मुंबईकर उपस्थित करीत आहेत.
मुंबईसह राज्यात पोटापाण्यासाठी युपी, बिहार, एम पी आदी राज्यातून आलेले मजूर भाडय़ाच्या खोलीत राहत होते. मुंबई वा इतरत्र राहून काबाडकष्ट करून ते जगत होते. मात्र, सर्व काही बंद पडल्याने परप्रांतीय कामगारांना मुंबई, महाराष्ट्रात व इतर राज्यात दिवस काढणे कठीण झाले. त्यांनी वांद्रे येथे उठाव केला. घरी पाठविण्याची मागणी लावून धरली. अखेर त्यांची व्यवस्था राज्य आणि पेंद्र सरकार यांनी केली आणि या परप्रांतीय मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला. शेकडो लोकांनी पायी, मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांचा अपघातात तर काहींचा थकल्याने मफत्यू झाला.
कोकणी माणसाचीही काही प्रमाणात अशीच स्थिती झाली. कोकणामधून मुंबईत नोकरीसाठी यायचे, नातेवाईकांकडे राहायचे आणि शिमगा, गणपतीला गावी जाऊन कुटुंबीयांसमवेत आनंद घ्यायचा. पण आता काम बंद, नोकऱया गेल्या. अनेकांनी आपले गाव गाठले. ज्या मुंबईत कोणीही उपाशी झोपत नव्हते, प्रत्येकाच्या हाताला काम मिळत होते, ती मुंबई काही लाखाने खाली झाली आहे.
लॉकडाऊनमुळे कोरोनाचा मोठा फैलाव होण्यापासून देशाला वाचवले जात आहे, तर दुसरीकडे नोकऱया गेल्या, आयुष्याची कमाई खाण्यावर जात आहे. अनेकांकडे घराचे भाडे देण्यासाठी, वीज, पाणी बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेकांनी कर्ज काढले आहे. ते व्याजासह परत करावे लागणार आहे.
कोरोनामुळे मनुष्यप्राण्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. जगायचे आहे म्हणून या कोरोनाच्या महासंकटात कसे तरी श्वास घेत आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णाला आज व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येत आहे. अनेकांना व्हेंटिलेटर, खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊन अनेकजण दगावले आहेत. मुंबईत 24 मे पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30,359 एवढी असून 988 लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50,231 असून आतापर्यंत 1,635 जणांचा बळी गेला आहे. आजही मोठय़ा संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. परदेशातून भारतीय मुंबईत दाखल होत आहेत. त्यांच्यामध्येही काहीजण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने मुंबईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे काम बंद असल्याने, नोकरी गेल्याने आर्थिक स्रोत बंद झाल्याने आज त्या माणसांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा श्वास देणारे व्हेंटिलेटर अद्याप कोणीही बनू शकलेले नाही. काहींनी कोरोनाला आणि रुग्णालयीन उपचाराला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
आज एकीकडे कोरोनासोबत लढा द्यावा लागणार आहे तर दुसरीकडे कंपनी, उद्योगधंदे बंद ठेवल्याने सरकारचे उत्पन्नाचे मार्गही बंद पडले आहेत. परिणामी सरकारने काही उद्योग सुरू केले आहेत. ऑनलाइन दारू विक्री सुरू केली आहे. गरिबांना, मजुरांना शिजवलेले अन्न, रेशनिंगवर स्वस्त दरात काही किलो धान्य पुरवठा करण्यात येत आहे. मात्र इतर सामान, वस्तू, गरजा यासाठी गरीब, मजूर, सामान्य नागरिकांच्या हातात पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ अन्नधान्याने नागरिकांच्या सर्व गरजा भागत नाहीत. आज गरज आहे कोरोनाला कायमस्वरुपी रोखण्याची आणि दुसरीकडे उद्योग, मोठे कारखाने सुरू करून गरीब, मजूर, कामगार, सामान्य नागरिक यांच्या हाताला काम देण्याची. शेतकऱयांना शेतपीक काढू देणे अत्यंत गरजेचे आहे. धान्यच पिकले नाही तर खायचे काय, हा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची भीती आहे.
आज देशात कोरोनाच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी पेंद्र व राज्य सरकार उपाययोजना कमी पडत आहेत. दुर्दैवाने पेंद्र सरकारला कोरोना चीनमध्ये असताना तेथील परिस्थितीवरून जागे होऊन स्वत:हून ज्या काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक होते. नेमके तेथे त्याचवेळी राज्य सरकार व पेंद्र सरकार कमी पडले. त्यामुळे आजच्या कोरोनाच्या महासंकटाला सरकारचे अपयश हे सर्वात जास्त कारणीभूत आहे. या कोरोनाच्या संकटामधून कधी मुक्तता होते, याची जनता चातकासारखी वाट पाहत आहे.
राज्यात कोरोनावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात घाणेरडे राजकारण सुरू झाले असून त्यालाही जनता कंटाळली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव, त्यामुळे होत असलेली जीवितहानी पाहूनही काही बेफिकीर नागरिक उघडपणे कुठेही फिरतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, कायमस्वरुपी हद्दपार होत नाही तोपर्यंत तरी देशाचा, राज्याचा व मुंबईचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येणे अशक्य आहे.
मारुती मोरे








