औंध / प्रतिनिधी
कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताबाची महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, याकरीता परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. परिषदेच्या सोशल मिडिया टीमचे गठन करण्याचा निर्णय कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा मामासाहेब मोहोळ कुस्ती केद्रात परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, दयानंद भक्त, हनुमंत गावडे, सुरेश पाटील, प्रा. बंकट यादव, कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बैठकीत कुस्तीच्या हितासाठी चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.
ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पझ्मभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी परिषदने भारतीय कुस्ती महासंघाचे माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. याकरिता महासंघाचे अध्यक्ष खा.ब्रिजभूषणसिंह यांनी अनुकुलता दर्शवली आहे. तसेच कोरोनामुळे सर्व राज्यस्तरीय स्पर्धा बंद आहेत. या पूर्ववत सुरू करण्यासाठी महासंघ आणि परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाने अनुकुलता दाखवली तर त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्पर्धा घेण्यासाठी परिषद सकारात्मक आहे. तसेच परिषदेची अधिकृत वेबसाईट कार्यन्वीत झाली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शहर जिल्हा तालिम संघाने सुचवलेले एक वेबसाईट मॅनेजर दोन सोशल मिडिया प्रतिनिधीची नियुक्ती परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे.
परिषदेच्या कायदेशीर बाबीसाठी कुस्ती क्षेत्रातील वकिलांचे कायदेशीर सल्लागार समितीचे पॅनेल गठीत करण्याचा ठराव देखील सर्वानुमते घेण्यात आला. परिषदेच्या पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पदक विजेता महेश मोहोळ आणि पंकज हरपुडे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला. तसेच मुलांच्या राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धेप्रमाणे वरीष्ठ गट महिला 15, 17,20, 23 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा देखील प्रायोजकाच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय यावेळी झाला.









