फिरोज मुलाणी / औंध :
यंदा तरी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार की नाही या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. यंदाची राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विना प्रेक्षक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडचाचणी घेण्यासाठी जिल्हा तालिम संघाना परिषदेने पत्राद्वारे कळवले आहे.
गेल्या वर्षी जिल्हा तालिम संघांनी कुस्तीगीर परिषदेच्या आवाहनानुसार महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड चाचणी घेतली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा घेण्यासाठी शासनाने अनुकुलता दर्शवली नाही. गेल्या वर्षी स्पर्धा झाली नसल्याने यंदा काय होणार याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू होती. भारतीय कुस्ती संघाने मात्र विना प्रेक्षक वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, निवड चाचणी पार पाडली.
यामुळे कुस्तीगीर परिषदेने देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा केला होता. दुसरी लाट ओसरल्याने शासनाने देखील मार्गदर्शक नियमांचे पालन करून स्पर्धा घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दाखवला होता. कुस्तीगीर परिषदेने यंदा विनाप्रेक्षक स्पर्धा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा तालिम संघांना पत्र पाठवून संघ राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र, पत्रामध्ये निवड चाचणी घ्यावी अथवा गेल्या वर्षी निवडलेला संघ पाठवावा याचा निर्णय जिल्हा तालिम संघावर सोपवला होता. याच निर्णयाचा काही तालिम संघानी फायदा उचलण्याची तयारी सुरू केली होती. निवड चाचणी न घेता गेल्या वर्षी निवडलेला संघ पाठवण्याची भूमिका घेतल्याने गत वर्षी दुखापतीमुळे स्पर्धेपासून लांब राहिलेले मल्ल हवालदिल झाले होते. तर गेल्या वर्षी वजनगटात निवड झालेल्या मल्लांची वजने वाढल्याने त्या वजनगटात कसे खेळायचे या काळजीने पैलवानांना ग्रासले होते. पैलवानांची अडचण काही पालक, प्रशिक्षक यांनी कुस्तीगीर परिषदेकडे मांडून न्याय देण्याची मागणी केली होती. परिषदेने देखील याचे गांभीर्य ओळखून जुन्या पत्रात बदल केला आणि यंदा होणाऱ्या स्पर्धेसाठी नव्याने जिल्हानिहाय आठ नोव्हेंबर पर्यंत निवड चाचणी घेऊन संघ पाठवण्याचे आवाहन नवीन पत्राद्वारे जिल्हा तालिम संघाना केले आहे. परिषदेच्या नवीन पत्रामुळे अव्वल दर्जाच्या मल्लांची कोंडी करण्याचे जिल्हा तालिम संघाच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. मल्ल, पालक, प्रशिक्षक यांनी मात्र कुस्तीगीर परिषदेने घेतलेल्या नवीन निर्णयाचे स्वागत केले आहे.









