फिरोज मुलाणी / औंध
राज्यातील तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पाठपुराव्याला यश आल्याने कुस्तीशौकिन आणि मल्लांनी आनंद व्यक्त केला आहे.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आठ महिने आखाडे बंद होते. मात्र शासनाने आखाडे व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्या नंतर कुस्ती पासून दूर असलेल्या मल्लांनी नव्या जोमाने सरावाल सुरवात केली आहे. सराव सुरू झाला असला तरी कुस्ती मैदाने बंद आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार काय? याची उत्सुकता पैलवान आणि कुस्तीशौकिनांना लागली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च किताबाची ही.स्पर्धा समजली जाते. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी राज्य शासनाकडे कोरोनाच्या नियम अटीचे पालन करून स्पर्धा आयोजनासाठी परवानगी मागितली होती. गेल्या आठवड्यात पुणे येथे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याशी देखील चर्चा केली होती.
ही स्पर्धा व्हावी अशी तमाम कुस्ती शौकिनांची तीव्र इच्छा होती. यामुळे कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना स्पर्धा आयोजनासाठी साकडे घातले होते. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडाआयुक्त ओमप्रकाश बखोरीया यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कुस्तीगीर परिषदेच्या मागणीला आज शासनाने ग्रीन सिग्नल दाखवल्यामुळे मल्ल आणि कुस्तीशौकिनांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शासनाने कुस्तीगीराच्या भावना जिंकल्या.
राज्यातील खेड्यापाड्यातील लोकांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी ही भावना होती. शिवाय यास्पर्धेतील विजेत्या मल्लांना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येते त्यामुळे या स्पर्धेला आणि किताबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने तमाम कुस्तीशौकिनांच्या भावना विचारात घेऊन आयोजनाबद्दल सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल शासनाचे मनापासून आभार.
बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद.