ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नशील- कॉन्टॅक्ट टेसिंग, चाचण्या, लसीकरण वाढवण्यावर पूर्ण भर देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने केंद्र सरकार अधिकच सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून सातत्याने राज्यांना मार्गदर्शन केले जात असताना संसर्ग वाढलेल्या दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकसह केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब यांचा समावेश आहे. ही पथके तीन ते पाच दिवस राज्यात राहून तेथील आरोग्य अधिकाऱयांना मार्गदर्शन करतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
देशाच्या विविध भागात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने 10 राज्यांमध्ये विशेष पथके तैनात केली जातील. राज्यांमध्ये जाणारी केंद्रीय पथके विशेषतः कॉन्टॅक्ट टेसिंग, आरोग्य यंत्रणेवर नजर ठेवणे, कंटेनमेंट झोनची स्थिती आणि कोरोना चाचणी केंद्रांवर लक्ष ठेवतील. तसेच चाचण्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले जातात की नाही यावरही या पथकाची विशेष नजर राहणार आहे. बेड्स, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा आदी सेवांच्या उपलब्धतेचा आढावाही केंद्रीय अधिकारी घेतील. याशिवाय कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. केंद्रीय पथक राज्यातील वैद्यकीय परिस्थितीचे मूल्यांकन करतील. सुधारणा सुचवतील आणि सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमासाठी उचललेल्या पावलांचा अहवाल रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केंद्र व राज्य सरकारांना सादर करतील, असे नियोजन सध्या करण्यात आले आहे.
देशात जानेवारीत तिसरी लाट ?
ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. कोरोनाच्या तिसऱया लाटेमागचे कारणही सांगितलंय. या लाटेमध्ये दुसऱया लाटेप्रमाणे गंभीर आजारी रुग्ण नसतील. पण आतापासूनच सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे केरळमध्ये कोरोना संसर्गावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीतील विशेषज्ञ डॉक्टर अनिस यांनी सांगितले. देशात येणाऱया कोरोनाच्या तिसऱया संभाव्य लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. ज्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असाही इशारा समितीने दिला आहे.
416 पैकी 115 जणांची ओमिक्रॉनवर मात
आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे एकूण 416 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 115 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. बाधितांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 108 रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत दिल्लीत 79, गुजरातमध्ये 43, तेलंगणात 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34 आणि कर्नाटकमध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्हय़ात शनिवारी तिसऱया ओमिक्रॉन रुग्णाची पुष्टी झाली. 15 डिसेंबरला अमेरिकेतून परतलेल्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तत्पूर्वी, 17 डिसेंबरच्या संध्याकाळी गाझियाबादमध्ये वृद्ध जोडपे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले होते.









