प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्राला भ्रष्टाचारूपी राक्षसाचा शाप लागला आहे. त्या भ्रष्टाचाररूपी राक्षसाचा वध करण्यासाठी आई अंबाबाई मला शक्ती दे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी नागरिक भ्रष्टाचारविरोधात लढाई करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. मात्र राज्य सरकार आम्हाला जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती आता सुरू झाली आहे. अंबामाता, अंबेआई मला आशीर्वाद दे, असे साकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी अंबाबाईला घातले. ते अंबाबाई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
तुम्ही अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात पोहोचला असता तिकडे परिवहनमंत्री अनिल परब ईडी कार्यालयात हजर झाले आहेत, याविषयी छेडले असता सोमय्या म्हणाले, ही अंबामातेची कृपा आहे. मुंबईतील कोविड घोटाळ्यासंबंधीच्या सुनावणीस सुरुवात झाली आहे. तेथील हॉस्पिटलची जागा घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.
घोटाळे बाहेर काढणाऱयांवर कारवाई करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि शरद पवार करत आहेत. सुडाचे राजकारण सुरू आहे. यंत्रणांचा दुरुपयोग होतो आहे. महाविकास आघाडी कशा पद्धतीने यंत्रणांचा गैरवापर करते त्याचा मी पुरावा देणार आहे, याकडेही सोमय्या यांनी लक्ष वेधले.
भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह
सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले. त्यावेळी माजी आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रवक्ते माजी नगरसेवक अजित ठाणेकर माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, नझीर देसाई, शंतनु मोहिते, विजय अगरवाल, विशाल शिराळकर, विवेक वोरा, प्रसाद मुजुमदार यांच्यासह महिला आघाडीच्या गायत्री राऊत, लता बरगे, सुनीता सूर्यवंशी, कोमल देसाई, मधुरा इनामदार, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हार्डीकर, प्राची कुलकर्णी, संगीता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.