जेष्ठ समिती नेते किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : हुतात्म्यांना करण्यात आले अभिवादन : सीमाभाग केंद्रशासीत करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाप्रश्नाचे घेंगडे मागील 65 वर्षांपासून भिजत पडले आहे. हा प्रश्न सीमावासियांचा नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाची सोडवणूक केली जात आहे. परंतु यासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीला झुकवायचे असेल तर महाराष्ट्राने कणखर भूमिका घेतली पाहिजे. तरच या सीमाप्रश्नाची सोडवणूक होईल, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
हुतात्मा दिनानिमित्त रविवारी बेळगावच्या हुतात्मा चौकात सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात किरण ठाकुर यांनी सीमावासियांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, मराठी भाषिकांना मान्य नसतानाही भाषावार प्रांतरचना करून त्यांना म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. नेहरूंच्या त्या एका चुकीमुळे सीमावासियांना 65 वर्षे लढा द्यावा लागत आहे. हा लढा अद्यापही जिवंत आहे, हेच सीमावासियांचे यश आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लोकेच्छा ओळखून केंद्र सरकारने न्याय द्यावा, हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
तोवर सीमाभाग केंद्रशासीत करा
सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कांसाठी खितपत पडला आहे. लोकशाही मार्गाने लढा सुरू असला तरी त्याला अद्याप म्हणावे तसे यश मिळाले नाही. हा लढा भाषा आणि संस्कृती टिकविण्याचा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सीमावासियांना मोठय़ा आशा आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न रखडत चालला आहे. त्यामुळे येथील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जोवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर हा संपूर्ण प्रदेश केंद्रशासीत करावा, असे किरण ठाकुर यांनी सांगितले.
प्रारंभी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अभिवादन फेरी काढण्यात आली. हुतात्मा चौक, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौक अशी ही फेरी काढण्यात आली. कोरोनाचे कारण दाखवत पोलिसांनी अभिवादन फेरीतील काही मार्ग वगळला. यामुळे पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी म. ए. समितीच्या नेत्यांनी विचार व्यक्त केले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, भाषावार प्रांतरचना करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या षडयंत्रात आम्ही बळी पडलो. भाषा-संस्कृती टिकविण्यासाठीचा प्रयत्न 65 वर्षांपासून अविरतपणे केला जात आहे. हा लढा दडपण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला. परंतु सीमावासियांनी बंधने झुगारून आजही सीमाप्रश्न तेवत ठेवला आहे. मान्यता नसतानाही केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी महानगरपालिकेसमोर ध्वज लावण्यात आला आहे. यालाही सीमावासीय सडेतोड उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अभिवादन कार्यक्रमासाठी मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, बाळासाहेब काकतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, शिवाजी हंडे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, ऍड. रतन मासेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, ऍड. महेश बिर्जे, उद्योजक आप्पासाहेब गुरव, सुहास किल्लेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दिलीप बैलुरकर, आप्पासाहेब पुजारी, संजय मोरे, रामा शिंदोळकर, रवि साळुंखे, सुनील बोकडे, राजू वर्पे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, सागर पाटील, महादेव पाटील, मदन बामणे, विनायक हुलजी, सतीश गावडोजी, मेघन लंगरकांडे यासह सीमावासीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांची कोगनोळी येथे अडवणूक
महाराष्ट्राचे राज्यमंत्री व कोल्हापूर जिल्हय़ातील नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर हे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला येत होते. परंतु त्यांचा ताफा कोगनोळी येथील टोल नाक्मयावर अडविण्यात आला. यावेळी मंत्री यड्रावकर व कर्नाटक पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यांनी कर्नाटक पोलिसांना चांगलेच सुनावले. पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे त्यांना पुन्हा कोल्हापूरला माघारी परतावे लागले. त्यांच्या सोबत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादनपर संदेश पाठवून दिला आहे. सीमावासीय नि÷sने हा लढा लढत आहेत. या लढय़ामध्ये महाराष्ट्र सरकार त्यांच्या सोबत उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातीनिशी या प्रश्नाचा पाठपुरावा करत असून, हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया संदेशाद्वारे त्यांनी पाठविली आहे.









