ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊन ची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अनेक जणांचा पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यास विरोध आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका मांडताना आज सांगितले की, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, राज्यात कोरोनाची संख्या वाढते, याबाबत चिंता आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे.
त्यामुळे लोकांकडून योग्य प्रतिसाद हवा आहे. लक्षणे नसलेल्या लोकांची फार काळजी वाटण्याचे कारण नाही. मात्र, अशा रुग्णांपैकी अनेकांची घरं लहान आहेत. अशा परिस्थितीत ते संपूर्ण कुटुंबाला बाधा पोहोचवतात. त्यामुळे लक्षणे नसलेल्या, पण ज्यांची घरं लहान आहेत, अशा पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वत:हून सरकारी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.








