ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील कोरोना संकट हाताळण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
राणे यांनी आज राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती महाविकास आघाडीला हाताळता आली नाही. कोरोना साथीशी लढा देताना या सरकारच्या क्षमता उघड्या पडल्या. सरकारी यंत्रणा कशा हाताळाव्यात, पोलीस दल कसे हाताळावे, याचा अनुभव नसल्याने हे सरकार अपयशी ठरत आहे.
मुंबईतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व रुग्णालये लष्कराच्या हातात द्यायला हवीत. तसेच या अपयशी सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली.









