ऑनलाईन टीम / मुंबई :
जून महिन्याच्या सुरवातीपासून कमी अधिक पडणाऱ्या पावसाने मागील काही दिवस दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात यंदा मोसमी पावसाने चांगली प्रगती केली आहे. 5 जूनला कोकणातून दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्याने राज्य व्यापले. मात्र काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी, तर काही ठिकाणी सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच महिन्यात राज्यात पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण राज्यात सरासरीपेक्षा अधिक 40 टक्के पाऊस झाला आहे.








