ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 116 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, 25 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे.
राज्यातील 2211 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 249 अधिकारी आणि 1962 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कालच्या तीन दिवसात तीन कोरोनाग्रस्त पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 970 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 83 अधिकारी आणि 887 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या काळात पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांवर 254 ठिकाणी हल्ले झाले असून याप्रकरणी 833 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या हल्ल्यात एकूण 86 पोलीस जखमी झाले आहेत.









