अजित पवार यांचे आज विधानसभेत सूचक वक्तव्य
ऑनलाईन टीम / मुंबई
गेल्या काही दिवसांपासून देशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. यामुळे केंद्र आणि राज्य स्तरावर आता पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू किंवा संपूर्ण लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या याच वेगाने वाढत राहिल्यास येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यूची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज विधानसभेत बोलताना तसे संकेत दिले आहेत.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही आज रात्री १० वाजता तातडीची बैठक बोलावली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ख्रिसमस आणि थर्टीफस्टच्या पार्श्वभुमिवर नागरिकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत बोलताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच महत्त्वाची बैठक बोलावली होती. देशाचे पंतप्रधान ओमिक्रॉनच्या परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करत आहेत असे स्पष्ट केले. तेसेच वरिष्ठ पातळीवर नाईट लॉकडाऊनची चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अद्याप निश्चित अशी नाईट कर्फ्यू किंवा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा झाली नसली तरी केंद्रासह राज्यशासनाच्या हालचाली पाहता हे संकेत लॉकडाऊनच्या दिशेने वळत असल्याचे स्पष्ट होते आहे.