ऑनलाईन टीम / नगर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पन्न घटलेले असले, तरी तूर्तास कर वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा चांगले काम करीत आहेत, मात्र, नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. बाहेरच्या जिह्यातून येणाऱया नागरिकांनी सक्तीने स्वतःला विलगीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महसूलमंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, लॉकडाऊनमुळे देशासह राज्याचे अर्थचक्र कोलमडून गेले आहे. औद्योगिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक फटका बसला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली, तरी तातडीने परिस्थिती बदलणार नाही. आता हळूहळू उद्योग सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्री सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झाले आहे. राज्याचे उत्पन्न घटलेले असले, तरी अद्याप कर वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णयसुद्धा घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळामध्ये विचारमंथन सुरू आहे.









