प्रतिनिधी/ बेळगाव
लोकशाही व न्यायालयीन मार्गाने मागील 65 वर्षांपासून सीमालढा सुरू आहे. मराठी भाषिकांना होणाऱया यातना, जाच, अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत आहेत. घटनेने देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु सीमाभागात मात्र मराठी भाषिकांना वेळोवेळी चिरडण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे जोवर सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही तोवर हा संपूर्ण सीमाभाग केंद्रशासीत करावा, अशी मागणी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने काळय़ा दिनाच्या निमित्ताने केली.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवारी मराठा कॉलनी येथे काळय़ा दिनानिमित्त निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्रात जाण्याची आजही इच्छा सीमाबांधवांनी व्यक्त केली. काळे कपडे, काळय़ा टोप्या, दंडाला काळय़ा फिती तसेच काळे मास्क घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावषी सायकलफेरीला परवानगी देण्यात न आल्याने म. ए. समितीने वेगवेगळय़ा ठिकाणी आंदोलन करून आपली इच्छा व्यक्त केली.
शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारने सीमाभागावर अन्याय केला. याची फळे आम्ही मागील 65 वर्षे भोगत आहोत. महाराष्ट्र सरकारदेखील तितक्मयाशा प्रमाणात सीमावासियांकडे लक्ष देत नसल्यामुळे हा प्रश्न रखडत चालला आहे. तरीदेखील येथील मराठी भाषिक म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली निवडणुकांच्या माध्यमातून आपली भूमिका वेळोवेळी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, हा प्रश्न केवळ भाषेशी नाही तर संस्कृतीशी आहे. आमची संस्कृतीच मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जितके डिवचण्याचे प्रकार होतील तितकाच हा सीमालढा अजून बळ घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर म्हणाल्या, महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आल्यामुळे सीमावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येथील मराठी भाषिक महाराष्ट्राकडे आशेच्या नजरेने बघत असून, हा प्रश्न लवकर सुटावा अशी मागणी त्यांनी केली.
माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळेच सीमाप्रश्न रखडत आहे. देशातील इतर प्रश्न मार्गी लावण्यात आले, परंतु सीमाप्रश्नावर तारखा देण्यात येत आहेत. यामुळे महाराष्ट्राने आता ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवाजी हंडे यांनी सीमावासियांच्या वेदना मांडून प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा केली. मराठी युवा मंचचे नारायण किटवाडकर यांनी सीमाप्रश्नाबद्दल आपली भूमिका मांडली.
यावेळी सुहास किल्लेकर, अजित कोकणे, मेघन लंगरकांडे, सतीश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, अंकुश केसरकर, प्रिया कुडची, दीपा मुतगेकर, रूपा नावगेकर, रेणू मोरे, श्रद्धा मंडोळकर, अनुपमा कोकणे यासह इतर सदस्य उपस्थित होते.









