- राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी !
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवस रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी पहिल्यांदाच उच्चांकी म्हणजेच 60 हजार 212 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 281 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 35 लाख 19 हजार 208 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 58 हजार 526 एवढा आहे.
कालच्याा एका दिवसात 31,624 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 28 लाख 66 हजार 097 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 93 हजार 042 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 % तर मृत्युदर 1.66 % इतका आहे.
- मुंबई : 11,263 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईतून दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवसात 11,263 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7,898 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासोबत 26 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5,35,017 वर पोहचली आहे. तर 4,34,941 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 12,086 इतकी आहे. सद्य स्थितीत 86 हजार 866 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांचा आहे.
- पुणे जिल्ह्यात 10 हजार पेक्षाा अधिक नवे रुग्ण
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 10,112 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 99 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे बधितांचा एकूण आकडा 6 लाख 68 हजार 126 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 10,895 जणांचा मृत्यू झाला आहे.