ऑनलाइन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात बुधवारी एका दिवसात 1879 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिलासादायक बाब म्हणजे आता पर्यंत राज्यात 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी कोरोनाच्या 3254 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 94 हजार 41 इतका आहे. त्यापैकी सध्या 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सध्या राज्यात 46 शासकीय आणि 37 खाजगी अशा एकूण 83 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 93 हजार 784 नमुन्यांपैकी 94 हजार 41 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 69 हजार 145 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 27 हजार 228 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात काल दिवसभरात 149 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 94 पुरुष आणि 55 महिला रुग्णांचा समावेश आहे. 87 रुग्ण 60 वर्षावरील आहेत. तर 40 ते 59 वयोगटातील 49 तर 40 वर्षाखालील 13 रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3438 झाली आहे.









