कुपवाडमध्ये भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे व विकासकामांचे उद्घाटन
कुपवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील भाजपा सरकार १६ महिन्यापूर्वी दगाफटक्याने पायउतार झाले. त्यानंतर विरोधकांनी फोडाफोडीचे राजकारण केले, तरीही भाजपाचे १०५ आमदार तसेच आहेत. विरोधकांनी आमच्या नादाला लागू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकाभिमुख कामामुळे देशात आणि राज्यात जनतेतून भाजपाची लोकप्रियता वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा प्रवेशाची मालिका सुरु होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कुपवाडमध्ये बोलताना केले.
नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे तसेच भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, निता केळकर, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, दीपकबाबा शिंदे प्रमुख उपस्थित होते. स्वागत करताना प्रकाश ढंग यांनी भाजपाच्या माध्यमातून आतापर्यंत कुपवाड शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.