ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आजपासून विमानसेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यात दररोज 25 विमाने उड्डाण करतील आणि 25 लँडिंग करतील. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आजपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील विमानसेवा सुरू करण्यास राज्य सरकार राजी नव्हते. अखेर काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतून देशांतर्गत विमानसेवाही आजपासून सुरू झाली आहे. सध्या 25 विमानांचे उड्डाण आणि 25 विमानांचे लँडिंग करण्यास परवानगी असून, हळूहळू ही संख्या वाढविण्यात येईल. तसेच लवकरच यासंदर्भात नियमावली आणि सूचना जाहीर करण्यात येतील.
देशांतर्गत विमानसेवेलाही प्रारंभ आजपासून देशातील विमानसेवाही सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब, हिमाचल, जम्मू कश्मीर आणि कर्नाटक या राज्यांनी सूचना जारी केल्या आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होम क्वॉरंटाईन राहण्याची अट आहे. ही अट कर्नाटक राज्यात सात दिवसांसाठी तर अन्य राज्यात 14 दिवसांसाठी आहे.









