वार्ताहर/ निपाणी :
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यांनी मद्यविक्री करणारी दुकाने बंद केली आहेत. लॉकडाऊनचे दिवस जसे वाढत आहेत. तशी मद्यपींची तळमळ वाढत आहे. यातून मागणीतही वाढ होत आहे. याचाच फायदा उठवत काही अवैध मद्य विक्रेते महाराष्ट्रातून सीमाभागाला मद्यपुरवठा करत आहेत. या प्रकारामुळे मद्यविक्री बंदचा उद्देश असफल होत आहे. याकरीता प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
लॉकडाऊन काळात मद्यविक्री सुरु करावी, अशी मागणी तळीरामांकडून होत आहे. शासनही महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी मद्यविक्री पूर्वरत करण्याकरीता गांभीर्याने विचार करत आहे. असे असले तरी अवैध मद्यविक्रीचा महापूर आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातून दूधपुरवठा करणारे वाहने व फळभाजीपाला वाहतूक करणाऱया वाहनांचा यासाठी वापर होत आहे. बेकायदेशीररित्या होणाऱया मद्याच्या उपलब्धतेतून तळीरामांची आर्थिक लूट सुरु आहे. मनाला येईल तितकी किंमत सांगून बनावट दारु विकली जात आहे.
यामुळे शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या प्रकारामुळे मद्याच्या आहारी गेलेल्या तळीरामांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकरीता प्रशासनाने याची कसून चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. काही अधिकाऱयांशी अर्थपूर्ण हितसंबंध या अवैध दारुविक्रीत जोडले गेल्याची चर्चा सुरु आहे. बेळगाव जिल्हय़ात लॉकडाऊन काळात अबकारी खात्याकडून तब्बल 78 कारवाया करण्यात आल्या आहेत. तरीदेखील अवैध दारुविक्री राजरोस सुरु आहे. याचे गौडबंगाल काय? असा सवाल या सर्व प्रकारातून पुढे येत आहे.
सीमाभागातून गुटखा तस्करी
महाराष्ट्रातून गुटखा विक्रीवर बंदी आहे. पण कर्नाटकात मात्र उत्पादन व विक्रीवर कोणतीही बंदी नाही. याचा फायदा उठवत काही गुटखा उत्पादक कारखाने अगदी गुप्तपणे सुरु आहेत. उत्पादीत गुटख्याची तथाकथित एजंटांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दामदुप्पट किंमत आकारुन तस्करी सुरु आहे. मध्यरात्री होणाऱया तस्करीकडेही प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.









