प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यातून बेळगावमध्ये येणाऱया नागरिकांची संख्या वाढली असून, कोरोनासोबतच शहरात दाखल होत असल्याने धास्ती वाढली आहे. काही नागरिक विशेष कक्षात नोंदणी न करताच थेट घर गाठत असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशा नागरिकांचा शोध घेण्याचा आदेश बजावून कारवाई करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकाऱयांना केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालल्याने नागरिक मूळ गावी परतत आहेत. सीमाभागातील नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. पण सध्या कोरोनामुळे तेथील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. घरातून बाहेर पडताच कोरोनाची लागण होईल का, अशी धास्ती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे क्वारंटाईन करण्यात येत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आल्याने घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. नोकरी नाही, व्यवसाय नाही अशा स्थितीत जीवनावश्यक साहित्य ऑनलाईन खरेदी करावे लागत आहे. तसेच दैनंदिन साहित्याचे दर देखील वाढले आहेत. अशा स्थितीत मोठय़ा शहरांमध्ये जीवन जगणे कठिण बनले आहे. त्यामुळे सीमाभागातून गेलेले नागरिक स्वगृही परतत आहेत. पण येताना सोबत कोरोना घेऊन येत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
बेळगावात दाखल होण्यापूर्वी कोगनोळी नाक्मयावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर शहरात दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या कुमार गंधर्व सभागृहातील विशेष कक्षात नोंदणी करून सरकारी संस्थेत किंवा होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रातून येणारे नागरिक कोगनोळी नाक्मयावर नोंदणी करून थेट घर गाठत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण घरी जाणाऱया नागरिकांची माहिती शहरातील विशेष कक्षात उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
कारवाई करण्याची सूचना
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातून येणारे नागरिक थेट घर गाठत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा नागरिकांचा शोध घ्यावा, तसेच कोगनोळी नाक्मयावर नागरिकांना सूचना करावी, असा आदेश महापालिका आयुक्तांनी मनपा अधिकाऱयांना बजावला आहे. असंख्य नागरिक नोंद न करताच घरी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोगनोळी नाक्मयावरून घरी गेलेल्या नागरिकांचा सदर यादी घेऊन शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









