कुपवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील एम.एस.एम.ई. अतंर्गत येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आपला उद्योग चालविताना अनेक अडचणींना तोड द्यावे लागत आहे. त्या अडचणी सोडवा, अशी मागणी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे कृष्णाव्हॅली चेंबरच्यावतीने करण्यात आली. चेंबरचे संचालक रमेश आरवाडे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी उद्योग मित्र आघाडीचे अध्यक्ष संजय अराणके, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे संचालक आनंद जोशी उपस्थित होते.
उद्योजक हे एम.एस.एम.ई.चे नोंदणीकृत आहेत. उद्योजकांचा माल शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उद्योग, खासगी व सहकारी कारखान्यांना पाठविला जातो. मालाचे पेमेंट ४५ दिवसात देणे बंधनकारक आहे. पण, ते मिळत नाही. काही उद्योजकांनी एम.एस.एम. ई.डी. २००६ कायद्याअंतर्गत पेमेंट वसुलीसाठी दावे दाखल केले आहेत. परंतु गेल्या २ वर्षापासून पुणे येथील कामकाज बंद आहे.
उद्योजकांना आपल्या कामगारांचे पगार, जी.एस.टी. बॅंकेचे हप्ते व व्याज तसेच विजेचे बिल हे दरमहा भरावे लागते. केवळ पेमेंट वेळेत येत नसलेमुळे उद्योजकासमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. चेंबरने सांगली जिल्हयातील उद्योजकांसाठी एमआयडीसीमध्ये औद्योगिक प्रदर्शन घेण्यासाठीही निवेदन दिले आहे. यावेळी मंत्री महोदयांनी उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याबाबत तसेच एमआयडीसीमध्ये औद्योगिक प्रदर्शन घेण्याबाबत अनुकुलता दाखविली आहे.








