महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ ‘डागी’; बेरजेचे राजकारण करणार
सांगली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा भाजपमय करण्यासाठी कंबर कसली आहे. जिथे पक्षाची ताकद कमी आहे, तिथे बेरजेचे राजकारण करू. पक्षाची ताकद वाढविणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ डागी आहे. मंत्र्यांच्या प्रतिमेबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे.पही त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान शिवाजीराव नाईक पक्ष सोडून गेले असले तरी त्यांच्या ठिकाणी ताकतीचा कार्यकर्ता तयार होईल, असेही मुंडे यांनी सांगितले.
सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी म्हणून मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज सांगलीचा धावता दौरा केला. येथील भाजप कार्यालतात माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त देशाचा नारा दिला आहे. तोच नारा राज्यातही आम्ही देत आहोत. महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्हा भाजपमय करण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. जिथे पक्षाची ताकद आहे, तिथे अधिक ताकद कशी वाढेल यासाठी प्रयत्न करू. जिथे ताकद नाही तिथे बेरजेचे राजकारण करून विजयाचे गणित घालू. पक्ष मजबूत करू.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका करत मुंडे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्ट आहे. अनेक मंत्र्यांवर आरोप आहेत. मंत्रीमंडळच ‘डागी’ आहे. तरीही अशा मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकले जात नाही. संवेदांशीलता संपलेली आहे, अशा पद्धतीचे काम सुरू आहे. दबाव टाकून राजकारण होत नसते. चुकीचे काम पाठीशी घालण्यासाठी एजन्सीच्या कारवायांच्या विरोधात आरडा-ओरडा करणे चुकीचे आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, निशिकांत पाटील, निताताई केळकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, नेते, प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.