25 जानेवारीपासून बेळगाव-नाशिकला सेवा सुरू,
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधून आता महाराष्ट्रातील 3 शहरांना विमानप्रवास करता येणार आहे. यापूर्वी मुंबई व पुणे या शहरांना विमानसेवा देण्यात आली होती. आता स्टार एअर 25 जानेवारीपासून नाशिकला विमानसेवा सुरू करीत असल्याने तिसऱया शहराला विमानप्रवास करता येणार आहे. नाशिकपासून शिर्डी अवघ्या 85 किलोमीटरवर असल्याने दर्शनासाठी जाणाऱया साईभक्तांना या विमानसेवेचा उपयोग होणार आहे.
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असणाऱया नाशिक शहराला विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. 25 जानेवारीपासून ही विमानफेरी सुरू होणार आहे. सोमवार, शुक्रवार व रविवार असे 3 दिवस ही फेरी असणार आहे. 2000 रुपये असा प्राथमिक तिकीट दर निश्चित करण्यात आला असून त्यावर कर असणार आहेत. उडान-3 अंतर्गत हा मार्ग मंजूर झाल्यामुळे अल्पदरात तिकिटे उपलब्ध होणार आहेत.
शिर्डी-त्र्यंबकेश्वर भक्तांची होणार सोय
बेळगावमधून शेकडो भाविक शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जातात. सध्या हे भक्त एकतर खासगी वाहन, बस तसेच रेल्वेने दर्शनाला जात होते. परंतु यामध्ये वेळ वाया जात असल्याने विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. नाशिकपासून शिर्डी 85 किलोमीटरवर आहे. त्र्यंबकेश्वर 40 किलोमीटर अंतरावर असल्याने येथून प्रवास करणे भक्तांसाठी सोयीचे ठरणार आहे.
सर्वाधिक शहरांना स्टार एअरची सेवा
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरने बेळगावमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. सध्या बेंगळूर, मुंबई, सुरत, अहमदाबाद, इंदूर, अजमेर व आता नाशिक या शहरांना स्टार एअर विमानसेवा सुरू करीत आहे. त्यामुळे बेळगावमधून सर्वाधिक शहरांना स्टार एअर सेवा देत आहे. यापुढेही अन्य काही शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअर प्रयत्न करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









