ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. पाच राज्यांपैकी ४ ठिकाणी भाजपने विजय मिळविला आहे. त्यामुळे आज राज्यात भाजपकडून ठिकठिकाणी आनंदोत्सन साजरा करण्यात येत आहे. गोवा विधानसभेत प्रभारी म्हणून काम पाहिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, सिंहगर्जना करुन गोव्यात गेलेल्या पक्षांचा दारून पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. याशिवाय २०२४ ला महाराष्ट्रातही सत्तांतर अटळ असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
गोव्यातील विजयानंतर मुंबईत परतलेल्या फडणवीसांचं जल्लोषी स्वागत झालं तसेच यावेळी फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत. त्यांचे काम, नेतृत्वाला सामान्यांनी दाद दिली आहे. त्यामुळे भाजप हा विजयाचा झेंडा फडकवू शकले. देशातील नागरिक भाजपाच्या पाठीशी आहेत. आमचा हा जल्लोष आतापुरता आहे. आज रात्रीपासून आम्ही पुन्हा कामाला लागणार आहोत. कारण अजून लढाई बाकी असून आम्हाला कर्तव्यांची जाणिव आहे. राज्यात युवा, महिला, शेतकरी, मजुर, मराठा आरक्षण, वेगवेगळे घटकांना न्याय द्यावा लागले, उद्यापासून तीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.