युवा समितीचे नेत्यांना पत्राद्वारे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. बेळगाव शहरासह 865 मराठी भाषिक बहुल असलेल्या खेडय़ांचा समावेश कर्नाटकात करण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळण्यात येतो. सीमाभागाप्रमाणेच महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यांनी दंडाला काळी फित बांधून त्या दिवशी आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने महाराष्ट्रातील नेत्यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सीमाभाग समन्वय मंत्री छगन भुजबळ व एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार व आमदारांना युवा समितीने पत्र पाठविले आहे.
सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात मागील 17 वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाची भूमिका ही मवाळ होत असून, कर्नाटक सरकारने मराठी भूभागावर आपली पकड मजबूत केली आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये कन्नड विषय सक्तीचा करण्यात आला आहे. कन्नड शिक्षण झालेल्या मुलांनाच नोकरी दिली जात आहे. त्यामुळे या प्रदेशावर महाराष्ट्राचा दावा असून तो बळकट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने करावा, अशी मागणी या पत्राद्वारे महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडे करण्यात आली आहे.









