प्रतिनिधी / इस्लामपूर
कर्जमुक्तीतून शेतकऱयांना दिलासा देण्याबरोबरच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देवून रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जाईल. इतिहासातील लढाया आता थांबवू. इतिहासाला अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवू, असे सांगतानाच राज्यसरकारप्रमाणेच केंद्र सरकारचीही पालकत्वाची जबाबदारी आहे. पण केंद्र सरकार दुजाभाव करुन मदतीसाठी नकार घंटा वाजवत आहे. महाराष्ट्राला महापुरुषांचा वारसा आहे. आमच्या मनगटात ताकद आहे. मदतीसाठी दिल्लीसमोर झुकणार नाही, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे दिला.
येथील नुतन तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. तर ना.हसन मुश्रीफ, ना.बाळासाहेब पाटील, ना.सतेज पाटील, ना.विश्वजीत कदम, ना.शंभुराजे देसाई, खा.धैर्यशील माने, आ.सुमनताई पाटील, आ.मानसिंगराव नाईक, आ.अनिल बाबर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी याच आवारातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास अभिवादन केले.
ठाकरे पुढे म्हणाले, शेतकरी कर्जमाफीच्या वादात आपणास पडायचे नाही. जे ठरवले ते करणारचं. अडचणीतील शेतकऱयाला दोन लाखांपर्यंचे कर्ज माफी दिली जाईल. दोन लाखांवरील व नियमित कर्ज भरणारांनाही दिलासा देण्याची योजना राबवू. ही केवळ घोषणा नाही, तर निश्चित अंमलबजावणी करणार. आमची भाजपा बरोबरची अनेक वर्षाची युती तुटली. केंद्रात त्यांचे सरकार येण्यासाठी आमची ही मदत झाली होती. पण आता केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे. पण आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही. शेतकरी जसा अन्नदाता आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदे वाढीसाठी उद्योजकांनाही सर्वती मदत केली जाईल. मुंबईत व महाराष्ट्रात नंबर एकचे उद्योगपती आहेत. त्यांची बैठक घेवून कामाला सुरुवात केली आहे. देशाची अर्थ व्यवस्था कोमात गेली असून त्यातून बाहेर पडायचे आहे.
ते पुढे म्हणाले, तहसील कार्यालयाची इमारत सुसज्ज झाली असून प्रशासनाने गोर-गरीबांची कामे वेळेत व पारदर्शी करावीत. कारभारातून जीवंतपणा आणा. ना.जयंत पाटील यांनी 2014 ला तात्काळ निधी मंजूर करुन ही इमारत पूर्ण केली. निधीचा विनीयोग झाला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शहरात भाजीमंडई व वाहनतळाच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे. ते काम ही सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ.जयंत पाटील म्हणाले, उदघाटन कोणाचे हस्ते होणार हे इमारतचं ठरवते. त्यानुसार उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच उदघाटनाचा सुवर्ण योग आला. प्रशासकीय इमारत पेठ-सांगली रस्त्याला झाल्यानंतर शहरातील व्यापाऱयांच्या आग्रहातून या इमारतीचा निर्णय 2013 ला घेवून पुढे आपले सरकार येणार नाही, याची चाहूल लागल्याने तात्काळ 13 कोटी 80 लाख निधी मंजूर करुन काम करण्यात आले. तालुक्याला क्रांतिकारक, साहित्यिकांचा वारसा आहे. अधिकाऱयांनी पारदर्शी कारभार करावा. मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र मंदीतून बाहेर काढण्याची जबाबदारी घेतली आहे. पाठीमागील सरकारने सामान्यांच्या हिताची काम केले नाही. त्यामुळे तीन पक्षांना एकत्र येवून सरकार बनवावे लागले. सरकार पडेल, अशी अपेक्षा धरुन अनेकजण आहेत. पण त्यांना पाच वर्षे वाट पहावी लागेल.
यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, 9 वर्षे अर्थमंत्री अर्थमंत्री पद मिळाल्याने भागाचा काया पालट केला. सत्तास्थापनेत व ठाकरे सरकार मधील सुरुवातीस झालेल्या सहा मंत्र्यांमधील जयंतरावांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. उध्दव ठाकरे हे विकासातून महाराष्ट्र पुढे नेणारे मुख्यमंत्री आहेत.
स्वागत व प्रस्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले. जिल्हा बांधकामचे अधिकारी सुरेंद्र काटकर यांनी इमारती विषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, तहसीलदार रविंद्र सबनीस, इस्लामपूर उपविभागाचे सहाय्यक अभियंत बी.एल.हजारे, पं.स.गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, प्रा.शामराव पाटील, पी.आर.पाटील, विनायक पाटील, विजयभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, चिमण डांगे, संग्रामसिंह पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, आनंदराव पवार, सुस्मिता जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी मानले.
गुदगुल्या… ओरखडे
मुख्यमंत्री ठाकरे यांनी ना.जयंत पाटील यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले. सुरुवातीला ना.मुश्रीफ यांनी न बोलता कार्यक्रम करणारा माणूस, अशी उपाधी जयंतरावांना दिली. तोच धागा पकडत, ठाकरे म्हणाले, ‘सगळा कार्यक्रम त्यांनीच करुन टाकला’. जयंत पाटील बोलतात, त्यावेळी मी कान देवून ऐकतो. ऐकताना गुदगुल्या वाटतात. पण समोरच्याला घरी गेल्यावर ओरखडे पडल्याचे कळते.
माझे नविन सहकारी मजबूत
ठाकरे म्हणाले, आमचं भाजपाशी अनेक वर्षाचं नातं तुटलं. पण मला मिळालेले नविन सहकारी मजबूत आहेत. क्रिकेटचा संघ निवडताना, खेळाडू ठरवले जातात. तसा माझा संघ आहे. संघ म्हटल्यानंतर दुसरा अर्थ लावाल, मला वादात पडायचे नाही, त्यामुळे माझी टीम म्हणा. ही टीमच नवा महाराष्ट्र घडवणार आहे.
देखणा सोहळा
इमारतीच्या उदघाटन सोहळयाचे संयोजन नेटके करण्यात आले होते. भव्य व्यासपीठ व उत्कृष्ट बैठक व्यवस्था होती. तर नवीन इमारत विद्युत रोषणाईने उजळली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी फित कापून उदघाटन केल्यानंतर इमारतीवर अताषबाजी करण्यात आली.