मला साथ द्यायची असेल तर कोकणी बांधवांनी उद्योजक बनावे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
राज्य सरकारसह शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राणेंची टीका
वार्ताहर / कणकवली:
मी जबाबदार मंत्री आहे. माझ्या खात्याचा कारभार सक्षम करून दरडोई उत्पन्न, निर्यात वाढविणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला हातभार लावणे माझे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांमध्ये माझ्या खात्यांतर्गत विकासाच्या योजना घेऊन जाणार असून औद्योगिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोकणी बांधवांनी मला साथ द्यायची असेल तर उद्योजक बनावे. येथील नागरिकांना उद्योग व त्यासंबंधी कर्ज, मशिनरी सर्व देऊ. मार्गदर्शन करण्याबाबत, उद्योगांबाबत ज्यांचे अर्ज आले, त्यांना आवश्यक ती माहिती देण्याचे आदेश अधिकाऱयांना देण्यात आले आहेत, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार सुप्रिया सुळे व राज्य सरकारवरही टीका केली. तसेच बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता, त्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी फक्त मीच जागा होतो, असेही राणे म्हणाले. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.
संजय राऊतांवर टीका
जनआशीर्वाद यात्रेत काही ठिकाणी अपशकून झाला. मी त्याची दखल घेत नाही. संजय राऊत यांनी आपल्या मालकाची मुले किती पराक्रमी आहेत, हे पाहावे. राऊत मला बोलायला प्रवृत्त करत आहेत. त्यांच्यामुळेच शिवसेना खड्डय़ात चालली आहे. त्यांनी माझ्या मुलांशी बरोबरी करू नये. माझ्या प्रतिमेला धक्का लागेल, अशी माझी दोन्ही मुले कधीही वागणार नाहीत. राऊत यांनी वैयक्तिक गोष्टी काढल्या तर मलाही ‘प्रहार’मधून सुरू व्हावे लागेल. त्यांना आमच्याविषयी काय काढायचे असेल तर ते एवढे दिवस ते का थांबले? राऊत शिवसेनेचे कोण? त्यांना कोण विचारतात? शिवसेनेची वाट लावण्याचे काम राऊत करत असल्याचे राणे म्हणाले.
मंत्री अनिल परबांवर टीका
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांप्रमाणे कसे आदेश देत होते, हे सर्वांनी पाहिले आहे. अगदी ‘अटक करा’ असे सांगून अधिकाऱयांना दम देत होते. शेवटी कॅमेऱयात मिळालेच ना? वास्तविक तुमच्याने जमत असेल तर तुम्ही यायचे ना, असा टोलाही राणे यांनी परब यांना लगावला. जनआशीर्वाद यात्रा जाऊ देणार नाही. शिवसैनिक यात्रा अडवतील, अशी भाषा करणारे शिवसैनिक सतरा, पंचवीस या संख्येपेक्षा अधिक दिसले नाहीत. ते ही गाडय़ांच्या मागे लपून. माझ्या माझ्याविरोधात बोलल्यास शिवसेनेत लगेच पद मिळते, त्याचे उदाहरण म्हणजे येथील खासदार असल्याचा टोलाही राणे यांनी विनायक राऊत यांचे नाव न घेता लगावला.
अजित पवारांनाही टोला
अजित पवार यांच्या वक्तव्याला उत्तर देताना राणे म्हणाले, पवार यांचे अज्ञान आहे. त्यांनी स्वत:च्या खात्याकडे पाहावे. मी अद्याप राष्ट्रवादीकडे पाहिलेले नाही. एका रात्रीत उपमुख्यमंत्री होऊन स्वत:वरील गुन्हे, केसेस कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राणे म्हणाले, आम्ही अद्याप राष्ट्रवादीविरोधात काहीच केलेले नाही. पण, त्यांची इच्छा असल्यास करू.
राज्य सरकारलाही केले ‘टार्गेट’
माझ्याकडील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याला थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून निधी येतो. अनेक योजनांना पंतप्रधानांकडूनही निधी येतो. त्यामुळे या खात्याकडे निधी नाही, अशा टीका कुणी करू नये. राज्यात तिजोरीत काय आहे? पूरग्रस्तांना अद्याप भरपाई नाही. शेतकऱयांना कर्जमाफीही नाही. सरकारी कर्मचाऱयांना पगार नाही, याची चिंता राज्य सरकारच्या मंडळींनी करावी, असा टोलाही राणे यांनी हाणला.
‘नाणार’ होणार असल्याचा उच्चार!
कोकणात विकासाची संधी द्या. विकास करण्यासाठी जमीन हवी. कारण ट्रेनिंग सेंटर, मशिनरी आदी बाबी असतात. कर्ज किती हवे, कोणता उद्योग हे सर्व समजल्यानंतरच निधी देणार. कारण हा निधी केंद्राचा असतो, असे सांगतानाच नाणार प्रकल्प होणार असल्याचा उच्चारही त्यांनी केला.
विकासकामांमध्ये पक्ष पाहणार नाही!
शिवसेनेचे खासदार विकासकामे घेऊन आले तर त्यांनाही निधी देणार असून त्यांनाही उद्योजक बनवणार. पण, अट घालणार की भाजपकडे वळा, असेही राणे मिश्किलपणे म्हणाले. तसेच राज्याची केंद्रासंबंधी कामे असतील तर मी कोणतीही गोष्ट लक्षात न ठेवता ती करेन. साहजिकच शिवसैनिक योजना घेऊन आला तर नक्कीच देऊ. याबाबतीत पक्ष पाहणार नाही, असेही राणे म्हणाले. जुन्या शिवसैनिकांचे यात्रेदरम्यान फोन येतात. ‘सामना’मधील लिखाणाविषयी मनाला लावून घेऊ नका. ते तसेच आहेत, असेही सांगतात. माझ्या घरावर हल्ला केलेला एक पदाधिकारी मला बोलला की, जे नेते होते त्यांना केसमधून बाहेर काढले व माझ्यावर गुन्हे दाखल झाले.
कोकण भाजपचा बालेकिल्ला बनवणार
ठाकरे – फडणवीस भेटीविषयी विचारले असता, कोण कुणाला भेटले तरी मला काहीही फरक पडणार नाही, असे राणे म्हणाले. राज्य सरकार आणखी किती दिवस राहणार, ते ज्योतिषाला विचारून सांगतो. राज्यातील भाजपचे सर्व नेते माझ्यासोबत आहेत. कोकण भाजपचा बालेकिल्ला बनवायला चाललोय. पुढच्या वेळी आमदार, खासदार सर्व आमचेच असतील. मंत्री म्हणून कार्यरत असताना चुका करणार नाही. कारण पाय ओढणारे तयारच असल्याचे राणे म्हणाले.
…त्यावेळी बाळासाहेबांसोबत मीच होतो!
शिवसेना घडायला आमचाही मोठा सहभाग होता. बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता. शरद पवार यांनी बाळासाहेबांना ‘मातोश्री सोडा’ असे सांगितले. त्यावेळी बाळासाहेबांनी फक्त मलाच ‘जीप घेऊन सोबत ये’ असे सांगितले. जेवढे दिवस बाळासाहेब अज्ञातस्थळी होते, तेवढे दिवस मी त्यांच्यासोबत होतो व झोपलोही नव्हतो. खायला कुठूनतरी आणायला सांगायचो. कधी माँसाहेब खायला द्यायच्या. गाडीतच झोपायचो, असेही राणे म्हणाले.









