पर्यटक सहली, हॉटेल्सची आरक्षणे रद्द, पर्यटन व्यवसायिकांत चिंता
प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्र राज्यात कोरोनासाठीचे नवीन नियम, अटी लागू करण्यात आल्यामुळे त्याचा विपरित परिणाम गोवा राज्यावर होत असल्याचे समोर आले आहे. अनेक पर्यटकांनी गोव्यातील डिसेंबरमधील व नवीन वर्ष जानेवारी 2021 मधील सहलीचे आयोजन तसेच हॉटेल्सची आगावू केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. त्याचा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातून अनेक लोक गोव्यात पर्यटनासाठी येतात. शिवाय अनेक राज्यातील पर्यटक मुंबईमार्गे गोव्यात येतात. त्यांना महाराष्ट्र सरकारची नवीन एसओपी मारक ठरत असून त्याचे परिणाम मात्र गोव्याला भोगावे लागण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक पर्यटकांनी बुकिंग केले रद्द
डिसेंबर महिन्यात शेवटी नाताळाची सुट्टी असल्याने शिवाय नवीन वर्षाच्या आधी अनेक पर्यटक गोव्यात मजा करण्यासाठी येतात ते सर्वजण रेल्वे, विमाने व बसने येतात. त्यांना मुंबईमार्गे महाराष्ट्रातून यावे लागते आणि ते पुन्हा त्याच मार्गाने परत जातात. महाराष्ट्र सरकारच्या कोरोनाबाबतच्या नवीन एसओपीमुळे पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी अनेक कटकटी व अडचणी निर्माण झाल्या असून त्यातून वाचण्यासाठी अनेकांनी गोव्यात येण्याचे बेत रद्द केले आहेत.
महाराष्ट्रामुळे गोव्यावर विपरित परिणाम
गोव्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. शिवाय पर्यटकांसाठी कोणतीही एसओपी नसल्यामुळे कटकटी नाहीत. म्हणून अनेक पर्यटकांनी गोव्यात येण्याचे बेत आखले होते, परंतु त्यांना ते नाईलाजाने रद्द करणे भाग पडत आहे. गोव्यातील हॉटेल्स, टॅक्सीवाले यांचा व्यवसाय त्यामुळे बुडणार असून ऐन पर्यटनात यंदा मंदी आहे. त्यात आता महाराष्ट्र सरकारच्या कोरोना विषयक धोरणामुळे गोव्याला पर्यटनाचे परिणाम भोगावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणामुळे अनेक हॉटेल्स चालक मालक तसेच टॅक्सीवाले चिंता प्रकट करीत असून गोव्यात येणाऱया पर्यटकांची महाराष्ट्र सरकारच्या एसओपीमधून सुटका करावी, अशी त्यांची मागणी आहे.









