प्रतिनिधी / दापोली
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव व कार्याकारी संचालक महावितरण यांच्या विरोधात संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही, तर वीज कंपन्यांशी संगनमत करुन करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे. ह्यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभित झाली असुन प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे.
याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणुक व मानसिक आघात पोहोचण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.