प्रतिनिधी / वडूज :
कमी रासायनिक व नैसर्गिक सेंद्रिय अन्नधान्य आरोग्यासाठी उत्तम असून, भाजप व मित्र पक्षांचे सरकार येईल त्यावेळी महाराष्ट्र राज्याची ओळख ही सेंद्रिय, विषमुक्त अन्न पिकवणारे राज्य म्हणून निर्माण करू, असे प्रतिपादन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाखणगाव येथे केले.
जाखणगाव (ता खटाव ) येथील येस सेंद्रिय शेतकरी गट प्रोजेक्टला सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. कृषी विभाग गटशेती योजनेअंतर्गत राबवले गेलेले 60 टक्के अनुदानातील औजार बँक ,शेततळे, ट्रेनिंग हॉल, ऑरगॅनिक फर्टीलायझर निर्मिती युनिट, गाय गोटा, पॅक हाऊस, सोलर युनिट या कामांची पाहणी सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी संस्थापक संजय भगत, सचिव अरुण विधाते ,संचालक बाळुताई जगताप, अध्यक्ष राजेंद्र भगत, सोसायटी अध्यक्ष सोमनाथ रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येस सेंद्रिय शेतकरी गटाने सेंद्रिय खते औषधे निर्मिती व बीजोत्पादन उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांना एका वेगळ्या वळणावर आणले आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. ज्यादा रासायनिक भाजीपाला फळे खाण्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. ही शोकांतिका आहे जर चांगले आरोग्य पाहिजे असेल तर सेंद्रिय, नैसर्गिक, कमी रासायनिक अन्नधान्य खाणे हाच लोकांच्या पुढे पर्याय आहे. येस सेंद्रिय शेतकरी गटाने निर्मिती केलेल्या स्लरी आर्क, गांडूळ खत, वर्मी वॉश आदी सेंद्रिय खत निर्मितीचा शेतकरी सभासदांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.









