ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला असून, राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक अथवा शिथिल करण्यात आले आहेत.
सध्याच्या रुग्णसंख्येनुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रीन झोनमधील वाहतुकीच्या नियमांमध्ये काहीशी सूट मिळणार आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. ग्रीन झोनमध्ये सोलापूर, वर्धा, परभणी, धुळे, नंदुरबार, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.









