सकाळी बागेत फिरून आल्यावर हॉटेलमध्ये न्याहारी करण्यासारखे सुख नाही. आसपास प्रसन्न सकाळ सांडलेली असते. लोक आनंदाने खात असतात. चहा-कॉफी घेत असतात. कश्शावरही अधिकारवाणीने तारस्वरात बोलत असतात. ऐकायला मजा येते. आता हॉटेल या शब्दाचा उच्चार देखील स्मरणरंजनवत वाटतो. या कोरोनामुळे किती दिवस झाले, हॉटेलात गेलो नाही.
आज न्याहारीत पोहे केले होते. पदार्थ म्हणून नव्हे, तर चमच्याने खाणे सोपे जाते आणि संगणकासमोर बसून खाता खाता फेसबुकवर फिरता येते म्हणून मला पोहे आवडतात. फेसबुकवर आज धमाल चालली होती. एका गृहस्थांनी लिहिले होते, “महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आहे. लोक नियम मोडून रस्त्यावर हिंडतात. रुग्णांची संख्या वाढते आहे. सरकार काही करीत नाही.’’
“युपीत किती छान आहे. तिथे आपल्याहून रुग्ण कमी आहेत.’’ त्यांच्या मित्राने री ओढली.
“तिथे रुग्णांच्या तपासण्या कमी झाल्या आहेत. म्हणून आकडा कमी आहे. विरोधी पक्ष सारखे सरकारवर टीका करतात. ही वेळ राजकारण करण्याची नाही.’’
“पण सरकारवर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे.’’
“उद्धव ठाकरे सरकार उत्तम काम करते आहे.’’
“केंद्र सरकार देखील उत्तम काम करते आहे.’’
“योगींनी महाराष्ट्रात का म्हणून लक्ष घालायचे? त्यांच्याकडच्या लोकांनीच परवा टाळेबंदी मोडली.’’
“महाराष्ट्र सरकारने त्यांना सगळय़ा सोयी द्यायला हव्या आहेत. त्यांची जबाबदारी घ्यायला हवी आहे. त्यात सरकार कमी पडते म्हणून सगळे परप्रांतीय युपी-बिहारकडे परत निघाले आहेत. महाराष्ट्राचा युपी-बिहार झाला आहे आणि युपीचा महाराष्ट्र झाला आहे.’’ यावर एकाने लांबलचक उत्तर लिहिले, “महाराष्ट्राचा युपीबिहार झाला आहे म्हटल्यावर आता इथे येणारे परप्रांतीयांचे लोंढे बंद होतील. पुण्याचे लोक युपीला स्थायिक व्हायला जातील. तिथे बाकरवडी, पेणचे कडवे वाल, साबुदाण्याची खिचडी, कैरीची डाळ मिळायला सुरुवात होईल. पावसाळय़ात खेकडा भजी हवीतच. आणि जमलं तर तुळशीबाग देखील हवीच. फक्त या पदार्थांची हिंदी नावे समजायला हवीत. दोपहर 12 से 4 बजेतक दुकाने बंद राहतील.’’
“आणि चतुर्थीचा उपवास सोडताना उकडीचे मोदक देखील हवेत,’’ दुसऱयाने कमेंट केली. पोहे संपले. मी संगणक बंद करून चहा करून आणायला स्वयंपाकघराकडे कूच केले.








