तालुका म. ए. समितीचा निर्धार : मराठी भाषिकांना सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असताना त्यांच्या भाषिक अधिकारांची पायमल्ली होत आहे. याविरोधात दि. 25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढली जाणार असून त्यामध्ये तालुक्यातून सर्वाधिक उपस्थिती असेल, असा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
तालुका म. ए. समितीची बैठक मंगळवारी मराठा मंदिर येथे पार पडली. प्रारंभी तालुक्मयातील दिवंगत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, मनपाकडून इंग्रजी, मराठी व कन्नड या तीन भाषांमध्ये फलक लावण्यात येत होते. परंतु सध्या केवळ कन्नड भाषेत फलक बसविण्यात येत आहेत. यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे फलकांवर मराठीला स्थान, मनपासमोर लावण्यात आलेला अनधिकृत लाल-पिवळा ध्वज हटविणे व मराठी भाषेत परिपत्रके देणे या मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर रोजी भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. तालुक्मयातील अधिकाधिक मराठी भाषिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
तालुका समितीच्या पुनर्रचनेसाठी नावे द्या
तालुका म. ए. समितीची पुनर्रचना केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातील मराठी भाषिकांना सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे समितीसाठी काम करू इच्छिणाऱया व्यक्तींची नावे देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विलास घाडी यांनी प्रत्येक गावातून अधिकाधिक व्यक्तींची नावे नोंदविण्याची सूचना मांडली. 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱया सायकल फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होऊ, यासाठी प्रत्येक गावात बैठका घेण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले. विनायक पाटील यांनी गटातटाचे राजकारण बाजूला करून समितीच्या झेंडय़ाखाली एक होण्याची विनंती केली.
यावेळी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, राजाभाऊ पाटील, संतोष मंडलिक, एम. जी. पाटील, मनोहर संताजी, ऍड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह इतरांनी मनोगते व्यक्त केली. तालुक्मयातील मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









