येळ्ळूरवासियांनी बैठकीत केला निर्धार
प्रतिनिधी/ येळ्ळूर
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी रात्री येळ्ळूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते.
येळ्ळूर गाव हे लढवय्या गाव आहे. साराबंदीसारखा लढा या गावाने लढला आहे. सीमाप्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर असणारे गाव म्हणून ओळखले जाते. सैनिकांचे गाव म्हणूनही नावलौकिक आहे. त्यामुळे निश्चितच येळ्ळूरवासीय मोठय़ा संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहतील, असे दीपक दळवी यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी सीडीएस बिपिन रावत यांना तसेच कै. मऱयाप्पा पाटील, जनाबाई गोरल, कल्लाप्पा पाटील, प्रभावती महादेव घाडी, शोभणा पाटील, राजेंद्र कृष्णा पाटील, यल्लाप्पा सांबरेकर, गणपती चौगुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, मनोज पावशे, प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, संतोष मंडलिक, चेतन पाटील, किरण धामणेकर यांनी विचार व्यक्त केले.
या बैठकीला ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, रावजी पाटील, विनोद आंबेवाडीकर, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, शिवाजी सायनेकर, सतीश देसूरकर, प्रकाश पाटील, विलास घाडी, दुद्दाप्पा बागेवाडी, रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, मनीषा घाडी, उदय जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी सर्वांचे स्वागत करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.









