वार्ताहर/ भुईंज
वेळे (ता. वाई) येथील खंबाटकी घाट उतरताना पुण्याहून सातारा दिशेला जाणाऱया अज्ञात वाहनाने रस्त्यावरील अज्ञात पादचाऱयाला ठोकरल्याने तो जागीच मृत झाला. सदर व्यक्ती ही अज्ञात असून 65 ते 70 वयाचे असून त्यांच्या अंगात धोतर व सदरा आहे. त्यांची ओळख पटवण्यासाठी भुईंज पोलीस शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. तर दुसरा अपघात बदेवाडी (ता. वाई) येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्री महामार्गावरील खड्डय़ात दुचाकी आपटल्याने पाठीमागे बसलेल्या (नाव समजू शकले नाही) इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालय याठिकाणी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर तिसरा अपघात बदेवाडी (ता. वाई) येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पुण्याहून सांगलीकडे निघालेली आय टेन कार खड्डय़ात आपटल्याने झालेल्या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला. या तीनही अपघातांची नोंद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सपोनि शाम बुवा पीएसआय रत्नदीप भंडारे, हवालदार सुनिल पोळ आदी करीत आहेत.








