प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील पेण येथील भोगावती नदीच्या पुलाखाली नदीपात्रात गुरुवारी जिलेटीन स्फोटकाच्या कांडय़ा आढळल्याने खळबळ उडाली. मात्र या कांडय़ा निक्रिय असल्याचे निष्पन्न होताच यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नदीच्या पात्रात फूटभर पाण्यात स्फोटकसदृश वस्तू दिसून येत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, दादर सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी व जादा पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली. रायगडसह नवी मुंबई बॉम्बशोध व नाशपथक आणि पेण नगर परिषदेचे अग्निशमक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक पथकाने जिलेटीन कांडय़ां बाहेर काढल्या. या कांडय़ा निकामी असल्याचे बॉम्बस्फोटक पथकाने स्पष्ट केल्याने साऱयांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या कांडय़ा वाहून आल्या की टाकल्या गेल्या या दृष्टीने पेण पोलीस तपास करत आहेत.









