वार्ताहर/ लोटे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पीरलोटेनजीकच्या वळणावर ऍसिड वाहून नेणारा टँकर उलटून वायुगळतीची घटना सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. वायूगळती सुरू झाल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱया वाहनचालकांमध्ये तसेच परिसरातील ग्रामस्थांत घबराट पसरली. अनेक वाहनचालकांचीही एकच पळापळ सुरू झाली. या अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल कंपनीतून हायड्रोक्लोरिक ऍसिड भरून निघालेला टँकर इचलकरंजीतील शेखर केमिकल कंपनीत जात होता. कंपनीतून बाहेर पडलेला हा टॅंकर पाचच मिनिटांत पीरलोटेनजीक आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टँकर उलटला. अपघातानंतर टँकरमधील ऍसिड बाहेर पडल्याने साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. वायूगळतीने नजीकच्या ग्रामस्थांमध्येही घबराट पसरली. याबाबतची माहिती लोटे एमआयडीसीतील अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर त्यांचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. एक्सेल कंपनीचे अधिकारी चंद्रकांत चाळके यांच्यासह केतन चाळके व अन्य कर्मचाऱयांनी मदतकार्य केले. अथक प्रयत्नानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अपघातामुळे काहीकाळ ठप्प झालेली वाहतूक परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर एकेरी सुरू करण्यात आली. या अपघातात टंकरचालक सुखदेव हल्वागोल (41) हे जखमी झाले असून त्यांना चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोटे पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विवेक साळवी यांनी अपघाताचा पंचनामा केला.









