महामार्ग आणि पूल तयार होतात तेव्हा लोकांची जमीन त्यात जात असते. या जमिनीकरता सरकारकडून भरपाई दिली जाते. पण चीनच्या ग्वानझोऊ शहरातील एक घटना अशा प्रकल्पांसाठी जमीन देण्यास नकार दिल्यावर काय घडते हे सांगणारी आहे. चीनमध्ये एक महामार्ग तयार केला जाणार होता. पण एक छोटेसे घर महामार्गाच्या आड येत होते. सरकारने संबंधित जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण घराच्या मालकीणीने जमीन विकण्यास नकार दिला आणि दीर्घकाळापर्यंत स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर महामार्ग तयार झाला आणि महिलेचे घर वाहतुकीने घेरले गेले.
10 वर्षांपर्यंत सरकारचा विरोध
संबंधित महिलेचे नाव लियांग आहे. ती 10 वर्षांपर्यंत चीन सरकारच्या विरोधात लढत राहिली. सरकार तिचे घर खरेदी करून तोडू इच्छित होते. पण महिलेने नकार दिल्याने विकासकाने तिच्या छोटय़ाशा घराच्या चहुबाजूला एक मोटरवे पूल तयार केला. आता या घराला नेल हाउस म्हणून ओळखले जाते.
मागील वर्षी महामार्ग खुला
हेझुयोंग ब्रिज नावाचा हा महामार्ग 2020 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या छोटय़ाशा घरात राहणारी लियांग खिडकीमधून केवळ हजारो वाहने धावत असल्याचे पाहू शकते. हे एक मजली घर 430 चौरस फुटांचे आहे. चारपदरी मार्गांच्या दरम्यान हे घर असल्याने याला मोठी किंमत मिळणेही दुरापास्त आहे.
सरकारकडून अनेक ऑफर्स
सरकार चांगल्या ठिकाणी दुसरे घर देत नसल्याने महिलेने जागा सोडली नव्हती. मी स्थितीला सामोरे गेल्याने अधिक आनंदी आहे. स्थिती घराब आहे असे लोकांचे मानणे आहे, पण मला हे शांत, स्वतंत्र, सुखद आणि आरामदायी वाटत असल्याचे लियांग यांनी म्हटले आहे. 2010 मध्ये अधिकाऱयांनी महिलेला अनेक ऑफर्स दिल्या होत्या. अनेक सदनिकांसह रोख रकमेचा प्रस्तावही यात सामील होता.









