मंत्री नीलेश काब्राल यांनी केपेतील ‘जनता दरबारा’त दिलेली माहिती : पंचायती, पालिकांकडे अंतर्गत रस्त्यांवरील गटारांची जबाबदारी
वार्ताहर /केपे
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील गटारांची देखभाल सार्वजनिक बांधकाम खाते करेल, तर अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत काम हे काम पंचायत किंवा पालिका करेल व यासंबंधी त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा दाखला हवे असेल, तर तो दिला जाईल, असे साबांखामंत्री नीलेश क्राबाल यांनी सांगितले. ते केपे येथे बोलावलेल्या मासिक जनता दरबारात जनतेच्या सूचना व समस्या जाणून घेतल्यानंतर बोलत होते.
यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर, मामलेदार प्रताप गावकर, मुख्याधिकारी मधू नार्वेकर व इतर हजर होते. या मतदारसंघात अनुसूचित जमातींतील लोकांच्या कूळ कायद्याशी संबंधित समस्या असून त्या महसूलमंत्र्यांकडे बोलून सोडवल्या जातील. तसेच सरकारी इमारतींच्या दुरुस्तीकरिता सरळ संबंधित प्रमुखाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहार केल्यावर दुरुस्ती हाती घेण्याचा विचार आहे. कारण त्या त्या प्रमुखाने त्यांच्या मुख्यालयाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यालयातून साबांखाकडे पत्रव्यवहार करणे आणि त्यानंतर सारी प्रक्रिया मार्गी लावणे यात खूपच वेळ जातो. त्यामुळे संबंधित प्रमुखांनी पत्रव्यवहार केला की, इमारतीची दुरुस्ती करण्याचा विचार आहे, असे काब्राल यांनी सागितले.
शेतकऱयांना वेळेवर पाणीपुरवठा करा
मडगाव ते तिळामळ या रस्ताच्या कामाचा आढावा घेण्यात आला असता, या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असून केपे पालिका क्षेत्रात बाजारातील लोकांच्या तक्रारी असल्याने काही कामांना सुरुवात केलेली नाही, असे साबांखाच्या अधिकाऱयांनी सांगितले. अनेक भागांत कालव्यांच्या माध्यमातून होणाऱया पाणीपुरवठय़ाच्या आधारे शेती केली जाते. त्यामुळे कालव्यांची दुरुस्ती सुरू करून शेतकऱयांना वेळेवर पाणीपुरवठा करावा, अशी समज काब्राल यांनी अधिकाऱयांना दिली.
आंबावली येथील शेतजमनीजवळ असलेल्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे, अशी मागणी विल्यम फर्नांडिस यांनी केली असता मंत्री काब्राल यांनी लवकरात लवकर ते काम हाती घेतले जाईल, असे सांगितले. आमोणा भागातील रस्ता रूंदीकरण व गटाराचे प्रश्न सोडवावेत, अशी विनंती दयेश नाईक यांनी केली असता ते प्रश्न सोडवू, असे आश्वासन मंत्र्यानी दिले. अंतरे, देवसा या गावात अजूनही रस्ता झालेला नाही. तेथील रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आलिंदा लासेंडा यांनी केली.
…तर कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकू
गावकरवाडा, केपे येथील जुनी जलवाहिनी वारंवार फुटत असून नव्याने घातलेली जलवाहिनी जोडण्यात यावी. ग्रामस्थांचा प्रश्न सुटेल, अशी मागणी करण्यात आली असता मंत्री क्राबाल यांनी स्थानिकांचे हित जपा, असा निर्देश दिला. तसेच निविदा मंजूर होऊनही कामे केली जात नसतील, तर संबंधित कंत्राटदारांची नावे काळय़ा यादीत टाकू, असा इशारा त्यांनी दिला. बार्से भागातील वावुर्ला गावातही रस्ता करण्यात यावा, अशी मागणी दत्ता वेळीप यांनी केली.









